वांबोरी चारीची पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने फोडली! पाथर्डी पोलीसात गुन्हा दाखल
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी - नगर - राहुरी- नेवासा तालुक्यातील ४५गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील करडवाडी नदीजवळ सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडली.
यामुळे तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेला पाणीपुरवठा बंद झाला असून ,पाईप लाईन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी पाथर्डी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला दि.१५ फेब्रुवारी पासून पाणी सोडले आहे, त्यानंतर दोन दिवसापूर्वीच पाणी तिसगाव- मढी येथील पाझर तलावात पोहोचले.
परंतु सोमवारी करडवाडी नदीजवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुख्य पाईपलाईन फोडली. यामुळे मोठ्या प्रमाणात करडवाडी शिरापुर नदीला पाणी वाहून गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेल्या
पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी तपास घेतला असता करवाडी नदीजवळ पाईपलाईन फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शाखा अभियंता आंधळे यांना कळवले.
त्यांनी कालवा निरीक्षक पांडुरंग अरगडे, बाळासाहेब थोरात, यांना सोबत घेवून घटनास्थळी येवून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्य पाईपलाईन पडल्याचे लक्षात आले त्यानंतर शाखा अभियंता आंधळे
यांनी पाथर्डी पोलिसात फौजदारी स्वरूपाचा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे.