महाराष्ट्र
दोन महिन्याच्या आत नवऱ्यानं बायकोकडं नांदायला जावं, अहमदनगरच्या न्यायालयाचा आदेश, वाचा नेमकं प्रकरण काय?
By Admin
दोन महिन्याच्या आत नवऱ्यानं बायकोकडं नांदायला जावं, अहमदनगरच्या न्यायालयाचा आदेश, वाचा नेमकं प्रकरण काय?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं (Civil Court of Ahmednagar) एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अहमदनगरमधील एका नवऱ्याला न्यायालयानं थेट बायकोकडे नांदायला पाठवण्याचा निर्णय दिला आहे.
अहमदनगर येथील हे पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यापैकी एक जण हा जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात नोकरीला तर दुसरा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. या दोघांचा ऑगस्ट 2014 मध्ये विवाह झाला होता.
नेमकं प्रकरण काय
2014 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. विवाहच्या दोन वर्षानंतर या दोघांना एक मुल झाले. मात्र, दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला असल्याने संसारात ओढाताण होत होती. त्यात मुलाचा सांभाळ करून नोकरी सांभाळताना दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. या वादातून पत्नीने नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच नवऱ्याची बदली होऊ शकते मात्र आपली बदली होऊ शकत नसल्याने नवऱ्यानं आपल्याकडे येऊन राहण्याची मागणी बायकोने केली होती. सोबतच सासरकडची मंडळी छळ करत असल्याचा आरोपही महिलेनं केला. यावरुन दोघांमध्ये आणखी वाद झाले. जुलै 2018 मध्ये पतीने पत्नीला परस्पर संमतीने घटस्फोटासाठी नोटीस पाठवून दिली.
घटस्फोटाची नोटीस आल्याने सुरुवातीला पत्नीला धक्का बसला. मात्र, आता संसारासाठी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धार पत्नीने केला आणि आपल्या वकीलामार्फत न्यायालयात धाव घेतली. महिलेच्या वतीनं वकील भगवान कुंभकर्ण आणि शिवाजी सांगळे यांनी कोर्टात बाजू मांडली.
दोन महिन्यांच्या आत नवऱ्याने बायकोकडे राहण्यासाठी जावे, न्यायालयाचे आदेश
सासरच्याकडून आपला छळ होत असल्याचे पत्नीने कोर्टात सांगितले होते. तसेच पतीने आपल्यासोबत नोकरीच्या ठिकाणी राहून संसार करण्याची मागणी पत्नीने केली होती. वास्तविक पतीची बदली होऊ शकत असताना देखील ते बदली करुन घेत नसल्याचे पत्नीचे म्हणणे होते. तसेच पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी देखील पत्नीने कोर्टासमोर केली होती. दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेत दोन महिन्यांच्या आत नवऱ्याने बायकोकडे राहण्यासाठी जाण्याचा आदेश दिला आहे. नवऱ्याने बायकोकडे राहण्याचे आदेश न्यायालयानं दिल्याने हा एक ऐतिहासिक निर्णय मनाला जात आहे.
हा निकाल अभूतपूर्व : अॅड. शिवाजी सांगळे
आमच्या वकिलाच्या कार्यकाळातील हा अभूतपूर्व निकाल आहे. पतीने पत्नीकडे नांदायला जावं असा निकाल देण्यात आला आहे. आतापर्यंतची अशी परिस्थिती होती की, लग्नानंतर बायकोने नवऱ्याकडे नांदायला जावं. मात्र, सध्या समाजच्या गरजा बदलल्या, राहणीमान बदललं आहे. पूर्वी पुरुष हा कमवता असायचा मात्र आता स्त्री देखील कमावती झाली आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ बोलण्याची गोष्ट राहिली नसून, अशा उदाहरणातून हे स्पष्ट होत आहे. हा निकाल समाजलाही दिशादर्शक ठरेल असं महिलेचे वकील शिवाजी सांगळे यांनी म्हटले आहे.
Tags :
1432
10