पाथर्डी- खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तालुक्यातील रांजणी गावात २०१९ मध्ये बुट्या उर्फ शिवराम साहेबराव पवार (रा.
रांजणी) याने गावात बांधकामावर काम करणाऱ्या साहिल ऊर्फ सोन्या मुबारक पठाण (वय १९, रा. खोसपुरी, ता. नगर) या मजुराच्या डोक्यात कुऱ्हाडाचा घाव घालून हत्या केली होती.
या घटनेनंतर पवार हा फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. पोलिसांना एका खबऱ्याने माहिती दिली की, पवार हा बीड जिल्ह्यातील देवी निमगाव (ता.आष्टी) येथे डोंगर परिसरात असलेल्या त्याच्या सासरवाडीत राहत आहे. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कौशल्य रामनिरंजन वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, कुमार कराड, पोलिस नाईक अनिल बडे, नीलेश म्हस्के, अरुण शेकडे, अतुल शेळके यांनी देवी निमगाव परिसरातील डोंगरातून संशयित आरोपी पवार याला बेड्या ठोकल्या.