जिल्हा बँक निवडणूक : भाजपची पुन्हा मुसंडी; महाविकास आघाडी अस्वस्थ
By Admin
अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक : भाजपची पुन्हा मुसंडी; महाविकास आघाडी अस्वस्थ
अहमदनगर- प्रतिनिधी
नगर जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने आज पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. कोपरगाव सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विरोधकांनी माघार घेतल्याने बँकेत आता भाजपचे चार संचालक बिनविरोध झाले आहेत.
बिपिन शंकरराव कोल्हे, किसनराव चंद्रभान पाडेकर व देवेंद्र गोरख रोहमारे यांनी आज कोपरगाव सेवा सोसायटी मतदारसंघातून माघार घेतली. सोमवारी अलकादेवी राजेंद्र जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे विवेक कोल्हे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात 25 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. उद्या (गुरुवार) दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे.
संचालक मंडळाच्या एकवीसपैकी आता पाच जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 16 जागांसाठी अजूनही 163 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
बँक निवडणुकीच्या प्रारंभी जिल्ह्यात महाविकास आघाडी भाजपची धूळधाण करेल, असे चित्र रंगविण्यात आले होते. प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपचा माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत वारू उधळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत भाजपला रोखण्यासाठीचे महाविकास आघाडीचे डावपेच कमी पडत असल्याचे चित्र आजतरी निर्माण झाले आहे.
आज आमदार नीलेश लंके (पारनेर सेवा सोसायटी), किसनराव चंद्रभान पाडेकर, देवेंद्र गोरख रोहमारे आणि बिपिनदादा शंकरराव कोल्हे (कोपरगाव सेवा सोसायटी), रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे व दिलीप काशिनाथ वर्पे (संगमनेर सेवा सोसायटी), राजेंद्र शिवाजीराव नागवडे व प्रणोती राहुल जगताप (श्रीगोंदा सेवा सोसायटी), कोंडीराम बाबाजी उंडे (श्रीरामपूर सेवा सोसायटी), भानुदास काशिनाथ मुरकुटे, केशव छगन भवर आणि विलास रावसाहेब शिरसाठ (इतर मागास वर्ग), किरण पांडुरंग पाटील, मधुकर लक्ष्मण नवले, प्रियांका देविदास देशमुख, केशव छगनराव भवर (बिगर शेती संस्था) सुभाष भीमाशंकर गुंजाळ, माधवराव सावळेराम कानवडे, गणपतराव पुंजाजी सांगळे, मधुकर लक्ष्मण नवले, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, संभाजीराव बाबुराव गावंड, उत्तमराव रायभान चरमळ केशव छगन भवर आणि अरुण विठ्ठल येवले (शेती पूरक-प्रक्रिया) यांनी माघार घेतली.