पाथर्डी-पिकाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी.- राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन
नगर सिटीझन live team -
विजबिल व विजतोडणी त्वरित थांबवावी तसेच गारपीट झालेल्या पाथर्डी तालुक्यातील गारपीट ग्रस्त भागातील डांगेवाडी,साकेगाव,पागोरी पिंपळगाव,सुसरे,सांगवी या गावांतील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तालुका अध्यक्ष भाऊसाहेब उघडे व शिष्टमंडळाने तहसीलदार श्याम वाडकर यांना दिले .
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशन काळामध्ये महा विकास आघाडी सरकारने वीज बिल थकबाकीदार वीज ग्राहकांची विशेषतः व्यवसाय करणाऱ्याची वीज तोडणार नसल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याला आपण हरताळ फासला आहे अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे कर्मचारी गोरगरीब व्यवसायिकांना अरेरावी करत आहे. या सर्व प्रकारच्या घटनांचा राष्ट्रीय समाज पक्ष धिक्कार करत आहे. तरी छोटे कुटुंब छोटे व्यावसायिक हे सर्व उद्ध्वस्त होत आहेत. या सर्वांना आपणच कारणीभूत आहात. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा वतीने विनंती करीत आहोत की आपण वीज तोडणी तात्काळ थांबवणे आणि त्यांना कनेक्शन पूर्ववत करून द्यावेत अन्यथा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आपल्या वसुली पथकास संपूर्ण गावांमध्ये कुठेही फिरू देणार नाही. व वीज तोडणी करून देणार नाहीत. तसेच गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची खूप नुकसान झाले आहे आणि तालुक्यातील 50 टक्के लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहेत तरी त्वरित पंचनामा करून त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी .असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर रासपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे, उपाध्यक्ष नानाभाऊ पाडळकर, युवक अध्यक्ष अंकुश बोके ,महेंद्र सोलाट ,यांच्या सह्या आहेत तहसीलदार श्याम वाडकर यांनी सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे पाठवून त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.