महाराष्ट्र
16611
10
शेवगाव तालुक्यातील दुचाकी गटारात पडून दोघे ठार; गुंजाळे गावाजवळील घटना
By Admin
शेवगाव तालुक्यातील दुचाकी गटारात पडून दोघे ठार; गुंजाळे गावाजवळील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पांढरीपूल-वांबोरी रस्त्यावर गुंजाळे गावाजवळ दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या गटारात पडून झालेल्या अपघातात शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी (दि.30) रोजी रात्री 9 वाजता घडली. या घटनेने आव्हाणे ग्रामस्थांत शोककळा पसरली आहे. विक्रम बाबुराव पठाडे (वय 30) व संदीप बापुराव कळकुंबे (वय 32, दोघे रा.आव्हाणे खु. ता. शेवगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे दोघे सोमवारी (दि.30) मोटारसायकलवरून (एमएच 16 एएल 1267) पांढरीपूल येथून वांबोरीकडे जात होते. या वेळी गुंजाळे गावाजवळ धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल गटारात जाऊन पडली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच गुंजाळे गावातील जवळच असलेल्या देवीच्या मंदिरासमोर बसलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे, वांबोरी पोलिस दूरक्षेत्रातील हवालदार चंद्रकांत बर्हाटे, दिनकर चव्हाण, पोलिस मित्र गोरक्षनाथ दुधाडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना त्यांनी वांबोरी (ता.राहुरी) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पवार यांनी घोषित केले. याबाबत त्यांनी दिलेल्या खबरेवरून वांबोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सहाय्यक फौजदार सी. एन. बर्हाटे करीत आहेत. दरम्यान, आव्हाणे येथे या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन होऊन दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आव्हाणे खु. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tags :

