अहमदनगर पोलिसांनी विकसित केले नवे सॉफ्टवेअर ; गुन्हेगारांची माहिती एकत्रित मिळणार, गुंडा रजिस्टर मेन्टेन करणार
By Admin
अहमदनगर पोलिसांनी विकसित केले नवे सॉफ्टवेअर ; गुन्हेगारांची माहिती एकत्रित मिळणार, गुंडा रजिस्टर मेन्टेन करणार
नगर सिटीझन live team -
गेल्या पाच वर्षापासून कोणावर कोणते कोणते गुन्हे दाखल आहे, याची अद्ययावत माहिती एकत्रित करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर पोलीस प...
अहमदनगर/प्रतिनिधी- गेल्या पाच वर्षापासून कोणावर कोणते कोणते गुन्हे दाखल आहे, याची अद्ययावत माहिती एकत्रित करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर पोलीस प्रशासनाने विकसित केले आहे. त्यातून दोनपेक्षा जास्त गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, अशा गुन्हेगारांची माहिती एकत्रित होण्यासाठी याचा आता उपयोग होऊ लागला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी असे सॉफ्टवेअर विकसित करण्याला चालना दिली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यांमध्ये गुंडा रजिस्टर अद्ययावत केलेले नाही. त्यामुळे ते अद्ययावत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांच्या 2 प्लस योजनेअंतर्गत गुन्हेगारांचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यामध्ये सर्वाधिक गुन्हे नगर जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी, यामागे आमच्याकडे कोणताही अर्ज आत्तापर्यंत प्रलंबित नाही व गुन्हे दाखल करण्यामध्ये दिरंगाई होत नाही असे निर्देश दिल्यामुळे गुन्ह्यांची नोंद तात्काळ होते. म्हणूनच नगर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, नगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती जिल्हा आहे. सात जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्यालगत आहे. गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा या जिल्ह्यामध्ये अधिक आहे. गुन्हे करताना गुन्हेगारांना शेजारच्या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो, ही वस्तुस्थिती आहे. तसेच हायवे रोड, रेल्वे याचासुद्धा गुन्हेगारांना सहारा मिळतो. या जिल्ह्यामध्ये स्थानिक व बाहेरील असे दोन्ही गुन्हेगार मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत, असेही ते म्हणाले.
गुन्हेगारांचा आढावा सुरू
नगर जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षाचा गुन्हेगारांचा आढावा घेत आहोत. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेगारीचे रजिस्टर मेंटेन केलेले नाही. गुंडा रजिस्टर सुद्धा मेन्टेन झालेले नाही. त्यामुळे तेसुद्धा करावे, असे आदेश दिले होते. नगर जिल्ह्यामध्ये शरीराविरुद्धचे 1665, प्रॉपर्टीचे 1885 असे गुन्हेगार आहेत. जिल्ह्यामध्ये साधारणतः वेगवेगळ्या माध्यमातल्या 200 टोळ्या या गुन्हेगारांच्या कार्यरत आहे, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 2 प्लस योजनेमध्ये आम्ही गेल्या पाच वर्षाचा आढावा घेतलेला आहे. ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत, अशांवर आगामी काळामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई असो अथवा तडीपारीची कारवाई असो किंवा टोळी असेल तर मोक्काअंतर्गत कारवाई असो, त्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये टू प्लस योजना राबवली होती. त्याच धर्तीवर ही नगर जिल्ह्यामध्ये राबवली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना याचा फायदा होत आहे. हे नवीन सॉफ्टवेअर घेतल्यामुळे यातून गुन्हेगारांची पार्श्वभूमी तात्काळ समजू शकणार आहे,
असेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच गुन्हेगारांचे मागचे रेकॉर्ड सुद्धा या माध्यमातून पुढे येणार आहे. पोलीस ठाण्यामध्ये गुंडा रजिस्टर अद्ययावत केलेले नाही. त्यामुळे ते अद्ययावत करावे असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यातील संख्या ही कमी-जास्त आता दिसून येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अशा पद्धतीने आम्ही आता उर्वरित गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे निर्देश सुद्धा सर्वांना दिले असल्याचे सांगितले. काही गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येतो. यामध्ये प्रॉपर्टी सारखे जे गुन्हे आहेत, त्याकरता आता पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिस पाटलांची घेणार मदत
ज्यांच्यावर टू प्लस असे गुन्हे दाखल आहेत व ते आता जामिनावर सुटलेले असतील किंवा बाहेर आलेले असतील, अशांवर नजर ठेवण्यासाठी जसे पोलीस कार्यरत आहेत तसेच आता गावातील पोलीस पाटलांची सुद्धा मदत घेऊन त्यांना या गुन्हेगारांची माहिती आम्ही देणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही गुन्हेगारांची एकत्रित माहिती करण्यासाठी जशी उपाययोजना राबवली, तशी नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवली आहे. आगामी काळामध्ये ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने लागू होईल याकरता शासन स्तरावरून विषय हाती घेण्यात आला असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.