राज्यस्तरीय उपवर वधु-वर,पालक परिचय मेळावा संपन्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या वतीने आयोजित भव्य राज्य स्तरीय उपवर वधु-वर,पालक परिचय मेळावा, खोकर फाटा श्रीरामपूर येथे रविवार
दि.२६ .३.२०२३ रोजी अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने लाड सोनार समाज बांधव, माता,भगिनी व जेष्ठ मंडळी उपस्थित राहीली होती.
श्री मधुकर मैड आणि गोविंद दादा आंबीलवादे यांच्या प्रयत्नांमधून हा मेळावा साकार होत असल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे सौ अंजली अभय धानोरकर उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या संख्येने सर्व समाज बांधवांनी आणि भगिनींनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांचेही सौ धानोरकर यांनी कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना उपजिल्हाधिकारी श्रीमती धानोरकर म्हणाल्या की या काही वर्षांमध्ये एक नवीनच ट्रेन्ड निर्माण झाला आहे. 'आम्ही आमच्या मुलीला स्वयंपाकघरात फिरकू सुद्धा देत नाही, तिला कोणतंही घरकाम सांगत नाही' असे आई वडील अभिमानाने सांगू लागले आहेत. परंतु या कामांना दुय्यम महत्व देण्याची अजिबात गरज नाही. केवळ मुलींनाच नव्हें तर मुलांनाही आवश्यक तेवढा तरी स्वयंपाक आणि घरकाम आलेच पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, मोठेपणा मिरवण्यासाठी ऋण काढून, घर गहाण ठेवून थाटामाटात लग्न लावणे सर्वस्वी चुकीचे आहे. त्याऐवजी अनावश्यक अशा सर्व खर्चाला फाटा देऊन विवाह सोहोळा संपन्न केला जावा, असेही त्यांनी सांगीतले.
या भव्य मेळाव्याचा उपस्थित सर्वांनी योग्य लाभ घ्यावा आणि समाजातील एकसंघता कायम ठेवावी, असेही आवाहन सौ धानोरकर यांनी केले.