महाराष्ट्र
विवाहेच्छुक तरुणाला एक लाखाचा गंडा, शेवगाव पोलिसांत नवरीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल
By Admin
विवाहेच्छुक तरुणाला एक लाखाचा गंडा, शेवगाव पोलिसांत नवरीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ शिवारात ऊसतोडीसाठी आलेल्या विवाहेच्छुक तरुणाला अगोदर एक नव्हे तर दोनदा विवाह झालेले असतानाही मुलीसह तिच्या दलालांनी जवळपास लाखभर रुपयांना गंडा घातल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
विशेष म्हणजे मुलीचा अगोदर विवाह झालेल्या एका मुलाविरुद्ध पोटगीचा दावा न्यायालयात चालू असतानाही या मंडळींनी या ऊसतोड मजूर युवकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शीला बबन खडसन, बबन सोनाजी खडसन, सतीश बबन खडसन (सर्व रा. पैठण), गोकुळा संदीप चाबुकस्वार (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) व प्रकाश पैलवान (रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संकेत विजय घोक्षे (वय 28, रा. शिरूर, जि. बीड) याने फिर्याद दिली आहे.
शीला खडसन, बबन खडसन, सतीश खडसन, गोकुळा चाबुकस्वार व प्रकाश पैलवान हे दोन महिन्यांपूर्वी सुनील मगर यांच्या नवीन दहिफळ येथील घरी आले होते. त्यावेळी तेथे असलेल्या संकेतच्या आई-वडिलांना आमच्याकडे मुलगी असल्याचे सांगितले. संकेतच्या आई-वडिलांनी त्यांना आम्हाला मुलाचे लग्न करायचे आहे. मात्र, मुलीने मुलाबरोबर ऊसतोडीचे काम केले पाहिजे, अशी कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी संकेतच्या आई-वडिलांना आमची मुलगी तुम्हाला देतो. ती ऊसतोडीचे कामही करेल. मात्र, आम्हाला 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. हे मान्य करत संकेतच्या आई-वडिलांनी सुनील मगर यांच्याकडून 50 हजारांची उचल घेऊन मुलीच्या वडिलांना दिली. मुलीला पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅम सोन्याची कर्णफुले, दहा भाराच्या चांदीच्या पट्टय़ा व पाच भाराचे पायातील चांदीचे जोडवे असे सोन्या-चांदीचे दागिने घेतले. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी लग्न लावण्यात आले.
त्यानंतर नवरी मुलगी दोन दिवस माहेरी जाऊन आल्यानंतर नवीन नवरी म्हणून सुरुवातीला त्यांनी तिला ऊसतोडीला नेले नाही. 15 दिवसांनी ऊसतोडीसाठी चल म्हटले, तर तिने दुखण्याचे नाटक करून येण्याचे टाळले. ती दवाखान्यातही येत नव्हती. यावेळी ती नातेवाईक व आई-वडिलांना सारखी फोन करायची. घरातील कामही करत नव्हती. 13 नोव्हेंबर 2022 रोजी तिने आई-वडील व भाऊ-बहिणीला नवीन दहिफळ येथे बोलावून घेतले. त्यांनी आम्हाला आमची मुलगी परत न्यायची असल्याचे सांगितले. त्यावर लग्नासाठी तुम्हाला उचल घेऊन दिलेले 50 हजार रुपये परत द्या, अशी मागणी केली असता संकेतसह त्याच्या आई-वडिलांना दमबाजी करण्यात आली. तिकडे गेल्यानंतर नातेवाईकाकडे चौकशी केली असता ती नांदायला येणार नाही, असे समजले. अधिक चौकशी केली असता मुलीचे या अगोदर दोनवेळा लग्न झाल्याचे समजले. त्यातील आकाश अण्णासाहेब नरवडे (रा. चितेगाव, ता. पैठण) याच्याविरुद्ध तिने पोटगीचा दावा दाखल केल्याचे समजले. त्यामुळे संकेतने फिर्याद दाखल केली आहे.
Tags :
334019
10