८६१ लाभार्थ्यांना घरांसाठी मिळाली जागा
By Admin
८६१ लाभार्थ्यांना घरांसाठी मिळाली जागा
नगर सिटीझन live team-
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत जागाच नसल्याने ७ हजार ५२४ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राबविलेल्या सप्तपदी अभियानामुळे ८६१ लाभार्थ्यांना घरांसाठी जागा मिळाली आहे. अनेक ठिकाणी जागा मिळविण्यासाठी अडचणी येत असून जागा मिळविण्याची ही प्रक्रिया अविरत सुरूच राहणार आहे. त्यासाठी मात्र साडेसहा हजार लाभार्थ्यांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने घरे नसलेल्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. घरकुले मंजूर झालेल्यांपैकी १ हजार ४४८ लाभार्थ्यांना पूर्वीच जागा मिळाली होती.
राहिलेल्या ७ हजार ५२४ लाभार्थ्यांना घरांसाठी जागाच मिळाली नाही. राहिलेल्या लाभार्थ्यांना जागा मिळावी यासाठी महसूल विजय सप्तपदी अभियनाच्या माध्यमातून यंत्रणेने प्रयत्न केले. त्याला काही अंशी यश आल्याने ८६१ लभार्थ्यांना जागा मिळाली. त्यामध्ये अनेक दिवसांपासून अतिक्रमित जागांवर घरकुल बांधण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली होती, तर काही ठिकाणी घरासाठी नव्या लाभार्थ्यांनी मागणी केली होती. तबब्ल ६ हजार ६६३ लाभार्थ्यांना ३१ मार्च आणि त्यानंतरही जागा मिळवून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. काही ठिकाणी वन विभागाची जागा असून त्या जागा अकृषक होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. कोपरगाव तालुक्यात ३२८ ठिकाणी शेती महामंडळाची व ९१ ठिकाणी पाटबंधारे खात्याची मालकी असल्याने या जागा घरासाठी मिळणे कठीण झाले आहे.
अतिक्रमण केलेल्या ५३० लाभार्थ्यांना मिळाली जागा
वर्षानुवर्षे काही कुटुंबे सरकारी किंवा खासगी जागांवर अतिक्रमण करून राहत होती. अशा ५३० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना आहे त्याच जागांवर घर बांधता येणार आहे. त्यामध्ये नगर तालुक्यात १०० पैकी २१, पारनेर २० पैकी १, श्रीगोंदा ५१ पैकी २, शेवगाव १६ पैकी १२, नेवासा १०१ पैकी ०, श्रीरामपूर २०७ पैकी १७७, कोपरगाव १३४९ पैकी ५१, संगमनेर ५९ पैकी १९, अकोले ४ पैकी १, राहुरी ५१७ पैकी २१८, राहाता १०७१ पैकी २३, पाथर्डी तालुक्यात २५ पैकी ५ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. सर्वाधिक मंजूर झालेले अर्ज राहुरी तालुक्यात आहेत.
तालुकानिहाय मिळालेली जागा
तालुका जागा नसलेल्या लाभार्थ्यांची संख्या जागा उपलब्ध झालेल्या लाभार्थ्यांची संख्या
अहमदनगर ३२८ २७
नेवासा ११३९ ७
श्रीगोंदा ६५९ ८८
पारनेर २४८ ३४
पाथर्डी २० ५
शेवगाव १२० २५
संगमनेर ४४४ १०६
अकोले २७ ०
श्रीरामपूर १४९० १७७
राहुरी ७०९ २८१
कर्जत ३२ ०
जामखेड ० ०
राहाता ९६७ २३
कोपरगाव १३४१ ८८
एकूण ७५२४ ८६१