महाराष्ट्र
36128
10
कवी आशिष निनगुरकर यांना स्व. राजाराम डाकवे राज्यस्तरीय
By Admin
कवी आशिष निनगुरकर यांना स्व. राजाराम डाकवे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी गावचे भूमिपुत्र हरहुन्नरी कलावंत व कवी आशिष अशोक निनगुरकर यांच्या "कुलूपबंद" या कवितासंग्रहाला सातारा (कराड)येथून दिला जाणारा २०२२ चा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे, बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेते किरण माने,महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम,ह.भ.प. विजय महाराज,संयोजक संदीप डाकवे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार स्पर्धेचे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले.यावेळी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. विविध विभागातील साहित्यकृतींमधून पाथर्डी गावचे भूमिपुत्र व सध्या मुंबई येथील रहिवासी हरहुन्नरी लेखक-कवी आशिष निनगुरकर यांच्या 'कुलूपबंद' या कवितासंग्रहाची निवड झाली होती. या कवितासंग्रहास यंदाचा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार कराड (जि. सातारा) येथील स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात
मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सृजनसंवाद प्रकाशनची निर्मिती असलेला "कुलूपबंद" हा कवितासंग्रह अंतःकरणातील संवेदना सांगणारा व सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.सृजनसंवाद प्रकाशनची उत्तम निर्मिती असलेला 'कुलूपबंद' या काव्यसंग्रहातील कविता या मार्मिक, प्रेरणादायी, वास्तववादी व वाचकाला समजतील, उमगतील अशा अत्यंत हृदयस्पर्शी व सोप्या भाषेत मांडणी केली आहे. कुठेही अवजड किंवा अवघड असे शब्द वापरण्यात आलेले नाहीत.ऑनलाइन, अंकगणित, गुरू, वेळ, स्वातंत्र्य, आयुष्य, भूकंप अशा अनेक कविता या काव्यसंग्रहाचा आशय व दर्जा वाढवितात. आशिषने यात अनेक विषय हाताळलेले आहेत. त्यात ‘कुलुपबंद’ नावाने कोरोना काळातील परिस्थितीचे यथार्थ चित्रण आहे. याव्यतिरिक्त उर्वरित कविता वेगवेगळ्या मानवी भावभावनांचे-नातेसंबंधांचे दर्शन घडवणार्या, प्रेरणा देणार्या, जीवनाचे तत्त्व उलगडून सांगणार्या आहेत.कोरोनाच्या या अवघड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र राबणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना म्हणजेच कोरोनायोध्द्यांना आशिष यांनी हा 'कुलूपबंद' कवितासंग्रह समर्पित केला आहे. आजतागायत या संग्रहाला एकूण सात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सिनेसृष्टीत अभिनय,चित्रपटलेखन,गीतलेखन व दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका निभावणारे आशिष निनगुरकर सध्या मुंबईत डाक विभागात कार्यरत आहेत.त्यांच्या अनेक सामाजिक माहितीपट व लघुपटांना विविध चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविण्यात आले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचा 'हरवलेल्या नात्यांचं गावं','न भेटलेली तू' व 'कुलूपबंद' हे तीन कवितासंग्रह तसेच कलाकारांवर आधारीत 'स्ट्रगलर' व 'चित्रकर्मी' व 'सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे 'उजेडाच्या वाटा' हे माहितीपर पुस्तके प्रकाशित आहेत.तसेच चपराक प्रकाशनातर्फे त्यांचे 'अग्निदिव्य' व 'लालबत्ती ते कारंबा' हे दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. 'कुलूपबंद' या कवितासंग्रहानिमित्त आशिष यांना सन्मानचिन्ह, मानपत्र,ग्रंथ,कोल्हापुरी फेटा आणि शाल असा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून लेखक-कवी आशिष निनगुरकर यांचे या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tags :
36128
10





