लाडक्या बहिणीं'च्या 38 हजार साड्या पडून; संपाचा फटका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना वाटपासाठी प्राप्त ३८ हजार साड्या वाटपाविना पडून आहेत.
वाटपासाठी अगोदर आचारसंहितेचा अडसर ठरला; तर आता महसूल कर्मचारी संपाचा फटका बसला आहे. त्यात सर्व्हर डाउन झाल्याने 'दुष्काळात तेरावा महिना' अशी अवस्था झाली आहे. (38 thousand sarees pending of women in Ladki Bahin Yojana)
महिलांना अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना वर्षातून एकदा मोफत साडी दिली जाते. जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत साडी वाटपासाठी जिल्ह्यात एक लाख ७६ हजार ५५२ साड्या दाखल झाल्या होत्या. दोन हजार ६०९ स्वस्त धान्य दुकानांमधून या साड्यांचे वाटप होणार होते. लाल, हिरवा, पिवळा व निळ्या रंगाच्या या साड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक लाख ३४ हजार ४६९ साड्या आचारसंहितेपूर्वी वाटप करण्यात आल्या असून, ४२ हजार ८३ साड्या वाटप करणे बाकी होते.
आचारसंहिता लागल्यावर साड्यावाटपाचा कार्यक्रम पुरवठा विभागाने थांबविला होता. आता आचारसंहिता शिथिल झाल्यावर साड्यावाटपाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. एक साडी ३५५ रुपयांना खरेदी केली. त्यामुळे या साडीबद्दल महिलांमध्ये आकर्षण असून, ती घेण्यासाठी गर्दी वाढली. त्यातच सर्व्हरमुळे काम संथ होत असल्याने महिलांना तासनतास थांबावे लागते.