एसटीबस मधून दागिने चोरणार्या महिलेला अटक; दागिने जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी येथील नवीन बसस्थानकातून एसटीने प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने चोरी करणार्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
चोरी केलेले सोन्याचे दागिने या महिलेकडून पोलिसांनी हस्तगत केले आहेत. वैशाली दादासाहेब देवढे ही महिला प्रवाशी दि. 19 एप्रिल 2023 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पाथर्डीच्या नवीन बसस्थानकावरून माहेरी जाण्यासाठी बसमध्ये चढत होती. त्या वेळी संशयित आरोपी अश्विनी अवि भोसले (वय 22, रा. माहीजळगाव, ता.कर्जत) या महिलेने वैशाली यांच्या पर्समधील साडेतीन तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याचे कानातील झुंबर व वेल व बारा ग्रॅम वजनाची साखळी असे सव्वासहा तोळे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. त्यानंतर देवढे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाथर्डी पोलिसांनी नवीन बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित महिला तोंडाला स्कार्फ बांधून देवढे यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरत असल्याचे निदर्शनास आले. त्याआधारे पोलिसांनी अश्विनी भोसले हीस अवघ्या वीस दिवसांत 9 मे रोजी नागापूर (अहमदनगर) येथून अटक केली. तिच्याकडील सर्व चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. पाथर्डीच्या न्यायाधीश अश्विनी बिराजदार यांनी आरोपी भोसले हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यादरम्यान पोलिसांनी तपास तिच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले.
पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, पोलिस नाईक कृष्णा बडे, नारायण कुटे, ज्ञानेश्र्वर रसाळ, महिला पोलिस कॉन्स्टेबल मनीषा वारे, प्रतिभा नागरे आदींनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीसह मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे.