कानिफनाथांच्या जयघोषात श्री क्षेत्र मढीत होळी पेटली
नगर सिटीझन live team-
पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर सोशल डिस्टनचे पालन करीत कानिफनाथ गडावर महाराष्ट्रातील पहिली होळी पेटली.
कार्यकारी मंडळाच्या बैठकीत रंगपंचमी आणि फुलरबाग यात्रा महोत्सव कोरोणाच्या संकटामुळे होणार नाही कोणत्याही परिस्थितीत भाविकांनी गडावर येउ नये असे अध्यक्ष संजय मरकड यांनी सांगितले. भाविकांना आँनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले जाणार आहे असे बैठकीत ठरले.
संपूर्ण महाराष्ट्रात फाल्गुन हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते परंतु मढी येथे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला होळी पेटवली जाते. ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबनतात्या मरकड, विश्वस्त भाउसाहेब मरकड, रविंद्र आरोळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, बाबासाहेब मरकड,अशोक मडकर,ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान पाखरे, भानाभाउ मरकड, सतिश पाखरे इत्यादी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता गडावर ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कडेकोट पोलीस बंदोबस्तात होळी पेटवन्यात आली. या सणाला भट्टीचा सण म्हणतात. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पो.काँ. अप्पा वैद्य यांनी चोख बंदोबस्त ठेवला.