महाराष्ट्र
40871
10
अनुदानावरील पहिला किसान ड्रोन दाखल; शेवगाव
By Admin
अनुदानावरील पहिला किसान ड्रोन दाखल; शेवगाव तालुक्यातील जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेची किसान ड्रोनसाठी निवड
किसान ड्रोनसाठी शेवगाव तालुक्यातील कृषी पदवीधर निवड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील किसान ड्रोन (Kisan Drone) योजनेच्या अनुदानास अखेर मुहूर्त लागला आहे. राज्यात पहिला किसान ड्रोन दाखल झाला आहे.
पहिल्या टप्प्यात काही कृषी पदवीधर, तसेच निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीसी) योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
किसान ड्रोनची किंमत अंदाजे दहा लाख रुपये असून पाच लाख रुपये अनुदान दिले जात आहे. ड्रोनला लावण्यात आलेल्या कीटकनाशक साठवणीच्या एका टाकीतून एक एकरचे शेत अवघ्या दहा मिनिटात फवारले जाणार आहे.
त्यासाठी शेतकऱ्याकडून एकरी ३०० ते ५०० रुपये आकारले जातील. देशात २ किलोपासून ते १५० किलो वजनाचे ड्रोन उपलब्ध आहेत. मात्र राज्यात सर्वसाधारणपणे २५ किलो वजनाचे ड्रोन शेतीकामासाठी स्वीकारले जात आहेत.
नगरच्या शेवगावमधील जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेची किसान ड्रोनसाठी निवड झाली आहे. याशिवाय वैजापूरचा गायत्री शेतकरी बचत गट, जळगावच्या आव्हाणे गावातील समर्थ शेतकरी बचत गट, इंदापूरच्या शेटफळमधील
बारामती अॅग्रो संस्था व लातूरच्या भडगावमधील आधुनिक शेतकरी गटाची निवड ड्रोनसाठी झाली आहे. सचिन हुंबे (ईट, ता. भूम, जि. धाराशिव), ऋषिकेश तरंगे (पापनस, ता. माढा, जि. सोलापूर)
या दोघांची ग्रामीण नवउद्योजक म्हणून ड्रोन योजनेत अनुदानासाठी निवड झाली आहे. शेती मशागतीसाठी ड्रोनचा वापर करणारा व्यवसाय आगामी काळात भरभराटीला येण्याची शक्यता आहे. त्यात आता कृषी पदवीधरांपाठोपाठ महिला संस्थादेखील उतरत आहेत.
कोल्हापूरचे शंकरानंद चौगुले पहिले मानकरी
"कोल्हापूरच्या माद्याळ कसबा येथील कृषी पदवीधर शंकरानंद चौगुले हे राज्यातील पहिल्या किसान ड्रोन योजनेचे अनुदान पात्र लाभार्थी ठरले आहेत. ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कीटकनाशक खर्चात ३० टक्के, तर पाणी वापरात ९० टक्के बचत होईल. कमी मजुरीत जलद फवारणी होईल. ड्रोनमुळे रोजगार निर्मितीचे नवे दालन ग्रामीण भागात उघडत आहे," अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
२५ ठिकाणी ड्रोनयुक्त सेवा सुविधा केंद्रे
केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून किसान ड्रोनसाठी निधी मिळाला होता. परंतु, अनुदान मंजूर केले जात नसल्यामुळे कृषी पदवीधर नाराज होते. ड्रोन कृती आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८ ड्रोन दिले जात आहेत. २५ ठिकाणी ड्रोनयुक्त सेवा सुविधा केंद्रे उघडली जात आहेत. अनुदानासाठी कृषी विभागाने सोडत काढून नावे निश्चित केली आहेत.
किसान ड्रोनसाठी निवडलेले कृषी पदवीधर ः विवेक आपटे (राणेगाव, ता. शेवगाव, जि. नगर), शहाबाज पटेल (धाराशिव),
विनोद पगार (पालखेड, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), शंकरानंद चौगुले (माघाल, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजपूत (शेळगाव, ता. जामनेर, जि. जळगाव),
बालाजी म्हस्के (सावरगाव म्हस्के, ता. जाफराबाद, जि. छत्रपती संभाजीनगर), गणेश जाधव (हरणगाव, ता. पेठ, जि. नाशिक), अमोल वाघ (टाकळ गव्हाण, ता. जि. परभणी),
सागर जामदार (बारामती, जि. पुणे), श्रीकांत चव्हाण (हातोला, ता. अंबाजोगाई, जि. बीड), नितीन टाके (दाभाडी, ता. आर्णी, जि. यवतमाळ), अभिषेक पतंगे (वनोजा आसेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम)
Tags :
40871
10





