मुलीचा मृतदेह आणला थेट पोलिस ठाण्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह हा थेट नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात आणल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
नगरमधील एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध घेतल्याने सुरुवातीला खासगी आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज पहाटे दीडच्या सुमारास तिचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी याबाबत पुढील कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट कोतवाली पोलिस ठाण्यात आणला. जो पर्यंत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल होऊन अटक केली जात नाही, तो पर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यातून हलवू देणार नाही, अशी संतप्त भूमिका घेतल्याने काहीसा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.