महाराष्ट्र
चांद्यात प्रचंड मारहाण करत मोठा ऐवज चोरून नेला
By Admin
चांद्यात प्रचंड मारहाण करत मोठा ऐवज चोरून नेला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चांद्यात दरोडेखोरांनी अक्षरशः नंगानाच करत प्रचंड दहशत निर्माण केल्याची घटना घडली.
अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत चालल्याचे दिसते. मागील काही दिवसांत चोरी, दरोडे आदी घटना सातत्याने समोर येत आहेत.
काल महाशिवरात्रीच्या मध्यरात्री वस्तीवरील लोकांना प्रचंड मारहाण करत दरोडेखोरांनी मोठा ऐवज चोरून नेला.
यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कर्डिले वस्ती वरील तीन जण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नगर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जखमींमधील ओंकार गंगाधर कर्डिले याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अधिक समजलेली माहिती अशी : चांदा लोहारवाडी रोड वरील कर्डिले वस्ती या ठिकाणी काल महाशिवरात्रीच्या रात्री साधारण 12 ते 1 च्या दरम्यान चोरट्यांनी बापू भाऊसाहेब कर्डिले यांच्या वस्तीवर प्रवेश केला. तेथे अर्चना ताई कर्डिले व नर्मदा कर्डिले यांना दहशत करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेले.
यावेळी बापू कर्डिले त्यांचे चुलते गंगाधर नामदेव कर्डिले, सुभाष नामदेव कर्डिले, कर्डिले वस्तीवरील लोक जागे होऊन त्यांच्या पाठीमागे पळाले. शेजारीच कांद्याच्या शेतात त्यांनी एकाला पकडले.
परंतु याच दरम्यान, पाठीमागून अंधारात लपून बसलेल्या त्यांच्या दुसऱ्या साथीदाराने त्यातील तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आपली लोक जखमी झाल्याचे पाहून कर्डिले वस्ती वरील लोकांनी चोरट्याला सोडुन जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला.
मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची खबर समजताच सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल फोजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान श्वान पथकही आले होते.
सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा तपास लवकर लावला जाईल असे उपस्थितांना सांगितले. अधिक तपास पोलीस करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत हे वाढलेले चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण पोलिसांसमोर आवाहन उभे करत आहे. नागरिकांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Tags :
1352
10