लग्नासाठी एका तरुणाचा लष्करी नोकरीचा बनाव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रेयसीला लग्नासाठी तयार करण्यासाठी लष्करात नोकरीला असल्याचा बनाव केल्याप्रकरणी लोणी (ता. राहाता) येथील एका युवकाला पकडून लष्करी अधिकार्यांनी त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी ही घटना घडली. त्याच्यावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
एका खासगी संस्थेमध्ये काम करत असताना लोणीच्या युवकाचे एका मुलीसोबत प्रेम जुळले होते. ‘तुला सरकारी नोकरी लागली तरच मी तुझ्या बरोबर लग्न करेल, नाही तर हे प्रेम प्रकरण इथेच थांबेल’ असे प्रेयसीने त्याला बजावले होते. यासाठी युवकाला भन्नाट कल्पना सूचली. त्याने लष्कराचा गणवेश खरेदी केला. त्या गणवेशातील फोटो प्रेयसीला पाठविला. मात्र, त्यावर समाधानी न होता तिने ‘तू ज्या ठिकाणी लष्करामध्ये नोकरी करतो त्या ठिकाणचे मला फोटो पाठव, असे सुनावले.
रविवारी दुपारच्या सुमाराला युवक गणवेश घालून लष्करी हद्दीमध्ये गेला होता. तेथे फिरत असताना संशय आल्याने लष्कराच्या अधिकार्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा मी एमआयआरसीमध्ये नोकरीस असल्याचे त्याने सांगितले. त्याने दाखविलेले ओळखपत्र बनावट असल्याचे लष्कराच्या लक्षात आहे. तसेच नोकरी मिळवण्यासाठीची काही बनावट कागदपत्रेही तयार केली असल्याचे आढळल्यानंतर लष्करी अधिकार्यांनी त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले.