धक्कादायक; घरी जेवायला बोलावून केला विवाहितेवर अत्याचार! चिंचोली गुरव येथील घटना; आरोपी पसार..
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गणेशोत्सवानिमित्ताने घरी जेवणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन एका विवाहित तरुणीवर अत्याचार करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे घडली आहे. आरोपी त्या महिलेचा नातेवाईकच आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर आरोपी विशाल सोपान शेटे (वय 36) पळून गेला आहे. भर दुपारी आरोपीच्या घरातच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी आणि पीडित महिला जवळचे नातलग आहेत. दोघेही विवाहित आहेत. जेवणाचे निमंत्रण आल्यावर महिला आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत आरोपीच्या घरी गेली होती. दुपारच्या वेळी जेवणाची पंगत सुरू होती. तेथे या महिलेने जेवण वाढण्याचे काम केले. नंतर आरोपीच्या पत्नीने घर झाडून घेण्यासाठी त्या महिलेला घराच्या तिसर्या मजल्यावरील खोलीतून झाडू आणण्यास पाठविले. त्यानुसार ती महिला झाडू आणण्यासाठी तिसर्या मजल्यावरील खोलीत गेली. तेव्हा आरोपी विशाल शेटे तिच्या पाठोपाठ गेला.
महिला आतमधून झाडू घेत असताना आरोपीने खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही. तिला म्हणाला की, ‘मी रात्री जेव्हा तुझ्या घरी येईल, तेव्हा दरवाजा उघडा ठेवत जा.’ वरच्या मजल्यावर हा प्रकार सुरू असताना खाली नातेवाईकांचे जेवण सुरू होते. ‘खाली गेल्यावर झाडू आणण्यास उशिरा का झाला असे कोणी विचारले तर मी मोबाईलवर व्यस्त होते, असे सांगायचे,’ असेही आरोपीने त्या महिलेला धमकावले होते.
मात्र, नंतर त्या महिलेने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यावर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विशाल सोपान शेटे याच्याविरुद्ध अत्याचार केल्याचा आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मात्र, महिला व नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्याचे समजताच आरोपी तेथून निघून गेला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नातेवाईकाकडूनच घरी जेवायला बोलावून भर दुपारी हा गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.