शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न - राज्यमंञी प्राजक्त तनपुरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाला एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीमुळे महावितरणचे काम थांबले तर संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले उपस्थित होते. तनपुरे म्हणाले की, ‘या दोन्ही तालुक्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले आहे. दोन दिवस त्या ठिकाणच्या भागाची पाहणी केली. त्यावेळी केलेल्या सूचनांच्या संदर्भात आज आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान विमा योजनेतर्गंत १५ हजार शेतकर्यांचे इंटिमेशन फॉर्म भरवून घेण्यात आले आहेत. दलदलीमुळे महावितरणला काही ठिकाणी पोल उभारत येत नाहीत. मात्र, इतर ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री अभावी काम थांबले नाही पाहिजे, अन्यथा कारवाई केली जाईल. ज्या ठिकाणी महावितरणला दलदलीमुळे काम करता येत नाही, अशा ठिकाणी प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.