महाराष्ट्र
साडेतीन दशकानंतर 'या' तालुक्यात ‘ऐक्याचे’ दर्शन! ठरल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास पुन्हा ‘एल्गार’..
By Admin
साडेतीन दशकानंतर घडले 'या' तालुक्यात ‘ऐक्याचे’ दर्शन! ठरल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास पुन्हा ‘एल्गार’..
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या हाणामार्यांना जबाबदार धरुन 1986 साली पोलिसांनी निष्पाप तरुणांची धरपकड सुरु केली. पोलिसांच्या या मनमानीला विरोध करण्यासाठी त्यावेळी संगमनेरकर रस्त्यावर उतरले. आंदोलने झाली, मोर्चेही निघाले. मात्र पोलीस ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेळीही पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या मनमानीचा परिणाम दोन दिवस संपूर्ण शहर धुमसण्यात झाला. गेल्या शनिवारी झालेल्या कारवाईतून त्याची पुनरावृत्तीच होत असल्याचे चित्र सध्या संगमनेरात निर्माण झाले असून यावेळी गोमातेच्या रक्षणासाठी बहुसंख्य असलेला हिंदू समाज एकवटला आहे. तेव्हाच्या आणि आजच्या परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला असला तरीही सामाजिक प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची संगमनेरकरांची वृत्ती मात्र आजही कायम आहे. सोमवारच्या आंदोलनाने साडेतीन दशकांपूर्वीच्या त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र सध्या संगमनेरात पहायला मिळत आहे.
6 सप्टेंबर, 1986 सालची गोष्ट. संगमनेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते. याच दरम्यान तरुणांच्या दोन गटात प्रचंड हाणामार्या झाल्या आणि त्यातून महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या रिक्षांची मोडतोड करण्यात आली. याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आल्यानंतर मोठा फौजफाटा संगमनेर महाविद्यालयात पोहोचला. त्यावेळी या हाणामार्यांशी कोणताही थेट संबंध नसतानाही पोलिसांनी सरसकट धरपकड सुरु केली. त्यात अनेक हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ज्या तरुणांचा ‘त्या’ घटनेशी संबंध नाही, त्यांना नाहक अटक कशासाठी हा प्रश्न तेव्हा ज्वलंतपणे उभा राहिला आणि त्यातूनच अवघं संगमनेर शहर एकवटलं.
आंदोलनाची हाळी देण्यात आली, मोर्चे निघाले. पोलिस प्रशासनाच्या मनमानी विरोधात तुफान घोषणाबाजी झाली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा बोलावला, त्यातून तणाव आणखी वाढला. आंदोलनकर्त्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेवून ज्या तरुणांचा भांडणाशी कोणताही संबंध नाही त्यांना तत्काळ तुरुंगातून सोडण्याची मागणी केली. मात्र अतिरिक्त फौजफाटा दिमतीला आल्याने मनमानी वृत्ती बळावलेल्या तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या धुडकावल्या. त्यामुळे शहरातील तणावात मोठी भर पडली. शहरातील गल्लीबोळात पोलिस प्रशासनाविरोधात रोष खद्खदू लागला.
पोलिसांच्या मनमानीला विरोध करण्यासाठी शहरातून मोर्चा निघाला, स्वातंत्र्य चौकात त्याची सांगता झाली. त्यावेळी याच चौकात जाहीर सभा झाली. या सभेत प्रा.एस.झेड.देशमुख, विनय गुणे, दिवंगत कुंदनसिंह परदेशी, पुण्यातून आलेले हिंदुत्त्वादी कार्यकर्ते नितीन सोनटक्के, शिवाजी चव्हाण आदींनी भाषणे करुन पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध केला. दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांचे समारोपाचे भाषण सुरु असताना तत्कालीन पोलीस उपअधीक्षक करमचंद डंड व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी स्वातंत्र्य चौकात मोठा बंदोबस्त एकत्रित केला. त्याचवेळी चिमटे नावाच्या हवालदारांनी एका कार्यकर्त्यावर नाहक काठी उगारल्याने जमा झालेला जमाव उधळला आणि स्वातंत्र्य चौकातच पोलिसांवर तुफान दगडफेक सुरु झाली.
संपर्क साधनांचा अभाव असलेल्या त्या काळातही स्वातंत्र्य चौकात लागलेल्या आगीचा वणवा काही क्षणातच संपूर्ण गावात पसरला. त्यातून पोलिसांवरही हल्ले होवू लागले, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी नेहरु चौक व परदेशपुर्यात असलेल्या पोलीस चौक्यांना आगी लावल्या. पोलीस ठाण्याच्या आवारातील असंख्य सायकलींची नासधूस करण्यात आली. पोलिसांनीही लाठीचार्ज, अश्रूधुराची नळकांडी यांचा मुक्त वापर केला. या सर्व घडामोडीतून प्रशासनाविरोधात पेटलेले शहर दोन दिवस आगीच्या ज्वाळांमध्ये धुमसत होते. त्यावेळी संगमनेरकरांनी निष्पाप तरुणांच्या अटकेविरोधात दाखवलेले सामाजिक ऐक्य इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. या घटनेनंतर मात्र 2001 सालच्या पालिका निवडणुकांचा अपवाद वगळता नागरिक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष कधीही उभा राहिला नाही.
मात्र, तब्बल साडेतीन दशकानंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होवू लागली असून इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यावेळी निष्पाप तरुणांसाठी एकवटलेला समाज आज निष्पाप मुक्या जीवांसाठी एकवटला आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने फोफावलेले संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने यावेळी नागरी रोषाचे कारण ठरले आहेत. अर्थात राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासूनच येथील कत्तलखान्यांवर कारवायांचे सत्र सुरु आहे. या कारवायाही थोड्या न् थिडक्या तीनशेहून अधिकवेळा झाल्या आहेत. मात्र त्यातून येथील कत्तलखान्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नसल्याचे शनिवारच्या घटनेतून स्पष्ट झाले. यापूर्वी होणार्या कारवाया केवळ पोलिसांपर्यंत असतं. कोणी खबर दिली की छापे घालायचे. कत्तलखाना चालकांशी साटेलोटे करुन थोडेफार दाखवायचे, बाकीचे सोडून द्यायचे. तपासात, पुराव्यात जाणीवपूर्वक त्रृटी ठेवायच्या अशा घटना वारंवार घडत होत्या.
त्यातून संगमनेरातील गोहत्येत मोठी वाढ होत गेली. मात्र त्याचे वास्तव चित्र सामान्य नागरिकाला कधीच दिसले नाही. त्यामुळे पोलिसांची कारवाई आणि कत्तलखाने यांचे संबंध कधीही उघड झाले नाहीत. पण म्हणतात ना ‘जेथे अति, तेथे माती’ या उक्तिप्रमाणे या कारवायांच्या पडद्याआड पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध उघड होण्याची घटना गेल्या शनिवारी घडली. सोशल माध्यमातून पहिल्यांदाच सामान्य माणसाला कत्तलखान्यांचे वास्तव दर्शन घडले आणि कारवायांच्या गोंडस कृतीवरील अवास्तविकतेचा पडदा आपोआप बाजूला सारला गेला. संगमनेरातील मदिनानगर, कोल्हेवाडी रोडवरील जमजम कॉलनी, भारतनगर, मोगलपुरा या भागात गोवंश बेकायदा जनावरांचे कत्तलखाने आहेत. जवळपास दहा मोठ्या वाड्यांमधील या कत्तलखान्यांमधून दररोज शेकडों गोवंशाची कत्तल होते व त्यांचे मांस मुंबई, औरंगाबाद, मालेगाव, गुलबर्गा (कर्नाटक), हैद्राबाद (आंध्रप्रदेश) इत्यादी ठिकाणी पाठविले जाते.
संगमनेरसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत असेल यावर शनिवारच्या आधी कोणीही विश्वास ठेवला नसता. मात्र मुक्यांचा रक्षीता ईश्वरच असतो, त्याप्रमाणे ठाण्याचे प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी हा सगळा प्रकार उघड केला. एकाचवेळी मारुन टाकलेल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अनेक गोमातांची छायाचित्रे पाहून जन्मताच संघर्षाचे बाळकडू सोबत घेवून येणार्या संगमनेरकराची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तब्बल साडेतीन दशकांनंतर संगमनेरकरांची पुन्हा एकदा एकजूट झाली. सोमवारच्या आंदोलनातून ही गोष्ट अधोरेखीत होण्यासह 1986 सालच्या त्या पर्वाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होताना दिसत आहे. यावेळी प्रशासनाने 45 तासांच्या आंत कत्तलखाने उध्वस्त करण्यासह येत्या सात दिवसांत आंदोलनकर्त्यांच्या मागणीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची खात्यातंर्गत चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे पुढील सात दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित झाले असले तरीही त्याची धग मात्र अजूनही असून प्रशासनाने ठरल्याप्रमाणे कृती न केल्यास पुन्हा एकदा एल्गार होणार असल्याचे स्पष्ट आहे.
Tags :
4990
10