चोरट्यांनी नवरी मुलीचेच दागिने केले लंपास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विवाह सोहळ्यात नवरी मुलीला घालण्यासाठी केलेले सोन्याचे साडेतीन तोळ्याचे गंठण व महिलेने तीचे स्वतःचे दागिने ठेवलेली पर्स असा सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगीता प्रफुल्ल लोंढे (रा. लोंढेमळा, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संगीता लोंढे यांच्या मामाच्या मुलाचे लग्न बुधवारी (दि.२७)
दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे एका मंगल कार्यालयात होते. त्यानिमित्त त्या देऊळगाव गलांडे येथे गेल्या होत्या. विवाह सोहळ्यात
नवरी मुलीला घालण्यासाठी नवरदेव यांच्या कुटुंबाने सोन्या चांदीचे दागिने केलेले होते. ते सांभाळण्यासाठी फिर्यादी लोंढे यांच्याकडे देण्यात आलेले होते. हळद आणि लग्न एकाच दिवशी असल्याने दुपारी १.२० च्या सुमारास मंगल कार्यालयात हळदीसमारंभ सुरु असताना फिर्यादी या पतीसह नवरीला हळद लावण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी नवरीसाठी केलेले दागिने आणि त्यांचेही दागिने ठेवलेली पर्स तेथेच बाजूला ठेवली. काही
वेळात अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स चोरली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. चोरीची घटना बुधवारी घडली. मात्र लग्न सोहळ्याची गडबड असल्याने सर्व कार्यक्रम उरकल्यावर गुरुवारी (दि.२८) त्यांनी पोलिस ठाण्यात जात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर हे करीत आहेत.