महाराष्ट्र
पेसा' क्षेत्रातील शाळांना 237 कंत्राटी शिक्षक; नियुक्ती आदेश जारी
By Admin
पेसा' क्षेत्रातील शाळांना 237 कंत्राटी शिक्षक; नियुक्ती आदेश जारी
नाशिक - प्रतिनिधी
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील आठ तालुक्यांमध्ये २३७ शिक्षकांची मानधन तत्त्वावर कंत्राटी नियुक्ती केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने नियुक्ती आदेश देताच या उमेदवारांनी आनंद व्यक्त केला.त्यांना १५ दिवसांच्या आत शाळेत हजर होण्याचे आदेश आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यात एकूण ५५९ उमेदवारांना नियुक्ती दिली होती.त्यानुसार नियुक्ती दिल्यानंतर शाळांवर हजर न झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्त देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने २३७ उमेदवारांना शुक्रवारी (ता. १७) नियुक्ती आदेश देण्यात आले. यामुळे आदिवासी दुर्गम भागातील शाळांना शिक्षक मिळणार आहेत. यात भाषा विषय समूह, गणित व विज्ञान, समाजशास्त्र विषय समूह, इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विषयांच्या शिक्षकांचा समावेश आहे.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कागदपत्रे पडताळणी केली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करत उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आदेश जारी झाला. यासंदर्भात सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, अनिल गिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अर्जुन निकम, अनिल दराडे, वरिष्ठ सहाय्यक नीलेश पाटोळे यांनी परिश्रम घेतले.
आमदारांचे आभार
दिवसभर प्रतीक्षा लागून असलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळताच त्यांनी आमदार हिरामण खोसकर यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात जाऊन अभिनंदन केले. मंत्री नरहरी झिरवाळ व आमदार खोसकर यांच्यासह आदिवासी आमदारांनी केलेल्या आंदोलनामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया या उमेदवारांनी दिली.
Tags :
10169
10