महाराष्ट्र
कॉपीमुक्तसाठी शिक्षण विभाग अलर्ट;
By Admin
कॉपीमुक्तसाठी शिक्षण विभाग अलर्ट; दहावी-बारावी परीक्षेसाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्तपणे राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत, त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी शूटिंग केले जाणार असून, त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष काळजी माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्या अनुषंगाने परीक्षेदरम्यान मोबाइलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबिले जात आहेत.परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक आहेत. यासह सहायक परीक्षकांच्या मोबाइलवरून प्रत्येक केंद्रावरील पेपर संपेपर्यंत हलचाली टिपण्यात येणार आहेत. त्या हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी शिक्षण विभागात वॉररूम तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी केंद्रावर दिसल्यास, परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांनी फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी उभे राहिल्यास, विद्यार्थ्यांनी बैठकव्यवस्थेत बदल केल्यास, गैरप्रकाराच्या हालचाली झाल्यास तत्काळ शिक्षण विभागात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला कळणार आहे.
भौतिक सुविधांची होणार कडक तपासणी
कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने यापूर्वी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला होता. तरीदेखील परीक्षेत अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले. आतापर्यंत केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज गेल्यास जनरेटर असल्याचे लेखी स्वरूपातच दिले जायचे; परंतु, प्रत्यक्षात काहीच नसायचे, ही वस्तुस्थिती होती.मात्र, आता शासनानेच त्यासंदर्भातील आदेश काढत प्रत्येक शाळेत विशेषत: बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहे. नुसतेच सीसीटीव्ही असून चालणार नाही, तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे.परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्रचालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे. यासह परीक्षा केंद्रांच्या परिसरात व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही आहेत का? लाइट गेली तर जनरेटर किंवा अन्य पर्याय आहे का? मुबलक पाणी, अशा सर्व सोयी-सुविधा आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
Tags :
43238
10