कोरोना विरुद्ध मन खंबीर ठेऊन लढा द्या.- ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शनिवार 01 मे 2021
कोरोनाला टाळण्यासाठी आता इंदुरीकर महाराजांचे चौथे सूत्र
सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. लसीकरण आणि इतर योग्य ते नियम पाळणे हेच सध्या कोरोनावर प्रभावी उपाय ठरत आहे. यामध्ये ‘हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे या त्रिसूत्रीच वापर करण्यास वारंवार सांगण्यात येत आहे.
परंतु आता समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी चौथे सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, मनाला खंबीर ठेवणे हे चौथे सूत्रही आता ककोरोना हरविण्यासाठी आवश्यक बनले आहे, भीती आणि मनाचा दुबळेपणा हा करोनापेक्षा भयंकर रोग आहे,’
असे सांगून त्यांनी लोकांना कोरोनाविरुद्ध गंभीरपणे लढा देण्याचे आवाहन केले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात ४०० बेडचे प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
त्याचे लोकार्पण इंदुरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘कोरोनाच्या संकटाने मानवी जीवन क्षणिक करून टाकले आहे. कोरोनाच्या संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला.
रुग्णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागलीय. त्यामुळं आता आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. मला करोना होणार नाही हा दृष्टिकोन नव्हे तर मी स्वत:ला करोना होऊ देणार नाही हा दृष्टिकोन आपल्याला ठेवावा लागेल,’ असं ते म्हणाले.