शेवगाव- दोन गटांत जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी, गोळीबाराच्या
By Admin
शेवगाव- दोन गटांत जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी, गोळीबाराच्या चर्चेने तणाव
नगर सिटी न्यूज 24 live नेटवर्क
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे रविवारी (दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन गटांत झालेल्या जीवघेणा हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा असून, या घटनेने बोधेगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पोलिस कर्मचारी कोलते यांच्या खूनप्रकरणातून निर्दोष सुटलेला सुरेश उर्फ पिनू कापसे (रा. अंतरवाली बुद्रुक, ता. शेवगाव) आणि गणेश कापसे या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोधेगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगत रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पिनू कापसे आणि जिल्हा परिषदेच माजी सदस्य नितीन काकडे यांचे समर्थक गणेश कापसे यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद पूर्वीपासून असलेल्या कारणांवरून उफाळून आल्याचे बोलले जात आहे. काही क्षणांतच दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीत पिनू कापसे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर गणेश कापसे हाही गंभीर जखमी झाला आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, अधिकृतरीत्या गोळीबाराला पुष्टी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी सोमीनाथ बांगर, ईश्वर गर्जे, गणेश बांगर, अर्जुन ढवळे, तसेच अन्य कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढविला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अलीकडच्या काळात शेवगाव तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढत असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामागे जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा टोळी संघर्ष आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांकडून संबंधितांची चौकशी केली जात आहे.
34685
10




