पोलिसांच्या ताब्यात असताना हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत जखमी आरोपीचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पोलिसांच्या ताब्यात असताना हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32, रा. मुकुंदनगर) याचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. सादिकला घेऊन जाताना भिंगार नाल्याजवळ त्याच्याजवळ पाच जणांनी मारहाण केली. तशी फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सादिकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सादिकचा मृत्यू झाला. सादिकचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके, नगर शहर विभागाचे उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख रूग्णालयात दाखल झाले. रूग्णालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. झोपडी कॅन्टीनकडून आणि तोफखाना पोलीस ठाण्याकडून जाणारा रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला होता. दरम्यान मयत सादिक याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.