चोरांना ग्रामस्थ व पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
नगर सिटीझन रिपोर्ट live टिम प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील शितपूर येथील रामचंद्र गायकवाड हे दुपारी आपल्या घरात झोपले असताना अचानक कपाटाचा आवाज आल्याने जाग आली. त्यांना घरात चोरटे दिसले. गायकवाड यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता त्यांना चोरट्यांनी जबर मारहाण केली व जबरदस्तीने त्यांच्याकडून त्यांच्या खिशातील व घरातील सोन्याचे दागिने व पैसे असा २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले.
चोरटे हे चोरी केल्यानंतर नागलवाडी गावाच्या च्या दिशेने पळालेले आहेत, अशी माहिती पोलिसांना गावाकऱ्यांनी दिली. त्यानंतर नागलवाडीच्या काही लोकांना फोन करण्यात आले. तसेच पोलिस व ग्रामस्थ चोरटे पळालेल्या दिशेने पाठलाग करीत असताना त्यांना आरोपी ढेबऱ्या उर्फ रामेश्वर राम चव्हाण ( वय २५) याला पकडण्यास यश आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ नागलवाडी मधून ज्या दिशेने रोड जातात त्या दिशेला आपली पथके पाठवली. या पथकांनी रामेश्वर जंगल्या भोसले ( वय २५), धला उर्फ मोहिनी रामेश्वर भोसले (वय २२) यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली व अंग झडती घेतली असता चोरी गेलेला काही माल त्यांच्याकडे मिळून आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केले आहे. आरोपींकडून १ लाख ६२ हजार ७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील अटक आरोपींवर यापूर्वीचे घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे चार गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली.