एक प्रेम कथा' या करुणा मुंडेच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच उफाळला वाद
By Admin
'एक प्रेम कथा' या करुणा मुंडेच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच उफाळला वाद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 15 मे 2021 , शनिवार
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. करुणा यांनी फेसबूक पोस्ट करत त्यांच्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम कथेचं पुस्तक (Book on love story) लवकरच प्रकाशित करणार असल्याचं म्हटलं होतं. या पुस्तकातून प्रकाशनानंतर काय काय समोर येणार आणि त्यातून काय वाद होणार हे प्रकाशनानंतरच कळेल. मात्र प्रकाशित होण्यापूर्वीच यावरून वाद (Controversy) मात्र सुरू झाले आहेत. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे (CM) करण्यात आली आहे.
करूणा धनंजय मुंडे नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या फेसबूक पोस्टमध्ये वापरलेल्या एका पुस्तकाच्या कव्हरवरील मजकुरामुळं वाद समोर आलाय. या पोस्टमधील फोटोत असलेल्या पुस्तकाच्या कव्हरवर "होली बायबल" असं लिहिलेलं आहे, तर त्याखाली प्रेम हा शब्द मोठ्या आकारात आहे. त्यामुळं होली बायवल या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
जगातील सर्वच ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. बायबलला अनन्य साधारण महत्त्व असून करूणा धनंजय मुंडे यांच्या फेसबूक अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमधील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होली बायबल असे इंग्रजीत लिहून पुस्तकाचं प्रमोशन केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळं ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यामुळं ही पोस्ट तात्काळ हटवावी. तसंच संबंधितांना असे कृत्य करण्यापासून परावृत्त करावं आणि योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं. दरम्यान, ज्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली होती, त्यावर रात्री उशिरा ही पोस्ट काढून टाकण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यावेळी फेसबुकवरून हे आरोप फेटाळून लावत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक घटना मांडल्या होत्या. हे प्रकरण आता निवळण्याच्या मार्गावर असताना, करुणा धनंजय मुंडे अर्थात करुणा शर्मा यांनी केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. त्यात त्यांच्या पुस्तकाच्या फोटोवरून नवा वाद उभा राहिला आहे.

