पोलिसांनी आणीबाणीचा काळ असातानाही अॉक्सीजन वाहने धरले अडवून
By Admin
पोलिसांनी आणीबाणीचा काळ असतानाही अॉक्सीजन वाहने धरले अडवून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी- 21 एप्रिल 2021
शेवगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अॉक्सीजनची मोठी आवश्यकता भासत आहे. जिल्हाच मोठ्या संकटात सापडलेला असताना शेवगाव पोलिसांनी वेगळीच आगळीक केली. त्यामुळे लोकांच्या जीवावर बेतले असते. अॉक्सीजनचा टँकर त्यांनी दोन दिवस अडवून ठेवला. पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर शेवगावात निषेध व्यक्त होत आहे.
अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक असलेले अॉक्सीजन सिलेंडर रुग्णालयास पुरवण्यासाठी घेवून चाललेले वाहन कुठलीही खातरजमा न करता पोलीस ठाण्यात आणले. चौकशीच्या नावाखाली दोन दिवस तेथेच अडवून धरले. या बाबत खुद्द तहसीदारांनीच शहानिशा केल्यानंतर ते पुन्हा संबंधित श्री संत एकनाथ रुग्णालयास पाठवून देण्याची नामुष्की पोलिसांवर आली.
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढला असून बाधीत रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील अनेक रुग्णांना आँक्सीजन देण्यासाठी रुग्णालयांना आँक्सीजन सिलेंडरची दैनंदिन गरज भासत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने आँक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णालयांना ते उपलब्ध करण्यासाठी खुप धावपळ करावी लागत आहे.
संपूर्ण राज्यातच अॉक्सीजन सिलिंडरबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासनही याबाबत सतर्क झाले आहे. सोमवारी (ता.१९) शेवगाव पोलीस ठाण्यातील एका जबाबदार अधिका-याने शहरातील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयास पोहच करण्यासाठी २२ अॉक्सीजन सिलिंडर घेवून निघालेले वाहन क्रमांक (एम.एच.१५ सी.के १५६९) कुठलीही खातरजमा न करता पोलीस ठाण्यात आणले.
विशेष म्हणजे त्याबाबतच्या मागणीचे रितसर पत्र आणि पावत्या संबंधिताकडे होत्या. त्या त्यांनी पोलीस ठाण्यात सादर करुनही चौकशीच्या नावाखाली ते वाहन दोन दिवस पोलीस ठाण्यातच अडकवून ठेवले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी ते आँक्सीजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांच्याकडे सपूर्द केले.
तहसीलदार यांनी संबंधित सिलिंडर श्री संत एकनाथ रुग्णालयास देण्याचे पत्र संबंधित अधीक्षक व पोलीस ठाण्यास दिले. त्यानंतर दोन दिवसानंतर ते सिलेंडर रुग्णालय प्रशासनास मिळाले. मात्र, सध्याच्या आणीबाणीच्या काळात २२ सिलेंडरचे वाहन केवळ चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यात अडकवून पोलिसांनी एक प्रकारे आपल्या अजब कारभाराचा नमुना दाखवला आहे.
शिवाय त्यांनी अॉक्सीजन अभावी गरजू रुग्णांच्या जीवीताशी खेळण्याचा गंभीर प्रकार केला आहे. वास्तविक पाहता रुग्णालयाच्या मागणी खेरीज खुल्या बाजारात अॉक्सीजन सिलिंडर कोणीही घेत नसतांना शेवगाव पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिका-यांने ही उठाठेव नेमकी कशासाठी व कोणाच्या सांगण्यावरुन केली. याबाबत संशय व्यक्त होत आहे.
अवैध धंद्यांकडे पहा अगोदर
कोरोनाविषयक प्रशासनाने घालून दिलेले नियम न पाळता शहरात व तालुक्यात अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. मात्र त्याकडे डोळेझाक करुन अत्यावश्यक सेवेला पोलिसांनी वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशा संतप्त भावना श्री संत एकनाथ रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त केल्या.