महाराष्ट्र
4668
10
सुसरेचे ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे निलंबित
By Admin
पाथर्डी तालुक्यातील सुसरेचे ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे निलंबित
पाथर्डी : सुसरे (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमितता, निधीचा अपहार तसेच विविध योजनांच्या कामांमध्ये अनियमितता केल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाल्याने ग्रामपंचायत अधिकारी गणेश बाबासाहेब ढाकणे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवारी (दि. २७) निलंबित केले.
दरम्यान, या प्रकरणी गेल्या दहा महिन्यांपासून पाठपुरावा करणारे सुसरे येथील ग्रामस्थ सुरेश उदागे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ग्रामपंचायत
कामकाजातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश उदागे यांनी केली होती. पंचायत समिती पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात सुसरे ग्रामपंचायतीच्या कामकाजातील विविध अनियमितता निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चौकशी अहवालानुसार अनियमितता, आर्थिक
कायमस्वरूपी निधीचा अपहार, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेतील निविदा प्रक्रिया व कामांमध्ये अनियमितता, चिंचफळ लिलाव, कर वसुली तसेच मंजूर आदेशाशिवाय अंगणवाडीचे निर्लेखन केल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच अन्य योजनांमध्येही आर्थिक अनियमितता झाल्याचे चौकशी अहवालातून दिसून येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने सचोटीने व कर्तव्यपरायणतेने
वागणे आवश्यक असताना ढाकणे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम तरतुदीनुसार त्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत. तसेच हडप करण्यात आलेला पैसा
लवकरात लवकर वसूल करून खर्च करण्यात यावा, अशी मागणी सुरेश उदागे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायतीतील गैरप्रकारांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. अखेर ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई झाल्याने या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मात्र, निलंबनानंतर पुढील चौकशी करून आर्थिक नुकसानाची वसुली होणे आवश्यक असल्याचे उदागे यांनी म्हटले आहे.
Tags :
4668
10




