खडकेद आश्रम शाळेत "जनजाती गौरव" सप्ताहास सुरुवात
कवडदरा-
राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात आदिवासी आश्रम शाळांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० व्या जयंती निमित्त विविध उपक्रम साजरा होत असल्याने, १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंत आदिवासी आद्य क्रांतिकारक यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आदिवासी आश्रम शाळांमध्ये या पंधरवाडामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहची सुरुवात खडकेद येथील आश्रम शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी आदिवासी संस्कृती पेहराव करून आदिवासी चालीरीती प्रदर्शित केल्या, संपूर्ण गांवात आदिवासी पावरा नृत्य करण्यात आले, प्रभात फेरीच्या घोषवाक्यांनी संपूर्ण खडकेद गावांत आनंदीमय वातावरण तयार झाले होते. तसेच आद्य आदिवासी क्रांतिकारक ओळख, प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तकांचे प्रदर्शन, पुरस्कार प्रदान करणे, उद्बोधन वर्ग, बचत गट मेळावा, बालनाट्य स्पर्धा व रानभाजी महोत्सव अशा आदिवासी संस्कृतीवर आधारित १५ सप्टेंबर पर्यंत दररोज पंधरा दिवसात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे शासनाने परिपत्रक जारी केले आहे. या जनजागृतीसाठी कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक मुख्याध्यापक विजय पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश निगळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.