गौण खनिज उत्खनन प्रकरणी 765 कोटींची दंडात्मक कारवाई; महसूल विभागाची मोठी कारवाई
By Admin
गौण खनिज उत्खनन प्रकरणी 765 कोटींची दंडात्मक कारवाई; महसूल विभागाची मोठी कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात (Sangamner Taluka) खाण चालक आणि स्टोन क्रशर मालकांना मोठा धक्का बसला आहे.
महसूल विभागानं कारवाई करत तब्बल 57 स्टोन क्रशर चालकांना 765 कोटींचा दंड ठोठावला आहे. स्टोन क्रशर चालकांनी परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन केल्यानं दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी आणि श्रीरामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
महसूल विभागाच्या कारवाईनंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. संपूर्ण तालुक्यातील खाण चालक आणि स्टोन क्रशर मालकांना महसूल विभागानं मोठा दणका दिला आहे. 57 स्टोन क्रेशर चालकांना अवैध पद्धतीनं गौण खनिज उचलल्या प्रकरणी तब्बल 765 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. परवानगी पेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन केल्यानं महसूल विभागाकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी आणि श्रीरामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले
आहेत. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे चुलत बंधू इंद्रजित थोरात यांना सुद्धा याप्रकरणी तब्बल 24 कोटी 53 लाख 72 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि बाळासाहेब थोरात यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात विखे पाटील महसूलमंत्री झाल्यावर केलेली ही राज्यातील सर्वात मोठी दंडात्मक कारवाई असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. त्यामुळे आजी आणि माजी महसूल मंत्र्यांमध्ये या कारवाईनंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, अशाच पद्धतीनं राज्यातील अवैध गौण खनिज प्रकरणी महसूल विभाग कारवाई करणार का? याकडे अनेकांच लक्ष लागले आहे.