तिसगाव- आरोग्य केंद्रच असुरक्षित; चोरीच्या घटना वाढल्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील 20-25 गावांतील सर्वसामान्य रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्राचीच सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून नवीन इमारत बांधली. त्याचबरोबर दीड कोटी रुपये खर्चून जवळच ट्रेनिंग सेंटरसाठी भव्य इमारत उभारली. ही इमारत प्रेमयुगुलांंचा आश्रयस्थान बनली आहे.
या इमारतीमधील अनेकआश्र खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक साहित्याची अनेकदा चोरी झाली आहे. एवढेच नव्हे आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर बॅटरीची काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. आठ दिवसांपूर्वी केंद्राच्या जुन्या इमारतीत आरोग्य विभागाने ठेवलेल्या साहित्याने अचानक पेट घेतला. ते जळून खाक झाले. अशा घटना आरोग्य केंद्राबाबत सातत्याने घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणार्या आरोग्य केंद्राचीच सुरक्षितता धोक्यात आल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्याचे नुकसान करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकार्यांना शिष्टमंडळ भेटणार आहे.असे परीसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केले.