महाराष्ट्र
3515
10
शेवगाव- महाविकास आघाडीचे जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन
By Admin
शेवगाव- महाविकास आघाडीचे जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन
परीक्षाकाळात वीज तोडू नका- क्षितिज घूले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतकर्यांची आस्था नसणार्या शासनाने सहा महिन्यांत शेतकर्यांच्या खात्यावर दमडीही जमा केली नाही. शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी दिला.
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांच्या उपस्थितीत शेवगाव शहरातील क्रांती चौकात शनिवारी (दि. 4) सकाळी जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे संजय कोळगे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बबनराव भुसारी, पंडित भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, संजय फडके, अजिंक्य लांडे, ताहेर पटेल, राजू दौंड, कृष्णा ढोरकुले, अॅड. अनिल मडके, संजय नांगरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल फडके, समद काझी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर, शीतल पुरनाळे, भारत लोहकरे, सिद्धार्थ काटे आदी उपस्थित होते.
कपाशीला 10 हजार रुपये भाव द्यावा, कांदा दरवाढ करावी, अतिवृष्टीचे अनुदान तातडीने जमा करावे, वीजपुरवठा बंद करू नये, पूर्ण दाबाने वीज मिळावी, पाटपाणी वेळेवर द्यावे, रब्बीची आणेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर करावी, रस्त्यांची कामे करण्यात यावीत, शहराला रोज पाणीपुरवठा व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणार्या शासनाने शेतकर्यांचे शेत ओरबाडले आहे. शेतकर्यांचा माल कवडीमोल भावाने घेऊन तो उद्योजकांच्या तोंडी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा डाव आहे. शेतकर्यांवर अन्याय करणार्यांचे दलाल शासनात आहेत, असा आरोप डॉ. घुले यांनी केला.
डॉ. घुले म्हणाले, शासन अनुदानाचे खोटे वायदे करत आहे. शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरी त्यांना जाग येत नाही. वीज तोडून शेतकर्यांना वेठीस धरले जात आहे. कापूस, कांद्याला भाव नसल्याने शासनाने निर्यातीचे धोरण घ्यावे. तालुक्यात अधिकार्यांना अधिकार नाही, त्यांच्यावर लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे. त्यांच्यावर हा राजा बसला आहे. आपला राजा चुकीचा निवडला तो बदलण्याची गरज असून, आपण तालुकाभर संपर्क यात्रा करणार आहोत. शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा डॉ. घुले यांनी दिला. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
परीक्षाकाळात वीज तोडू नका
वीजपुरवठा बंद केल्याने परीक्षा काळात मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला. त्यामुळे वीजपुरवठा तोडू नये, तशा सूचना संबंधित अधिकार्यांना देण्याची मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली. त्याची दखल घेऊन प्रशिक्षणार्थी तहसीलदार गुरव यांनी वीज बंद न करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
Tags :

