पाथर्डी तहसिल कार्यालयासमोर कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलन
पाथर्डी- प्रतिनिधी
केंद्र सरकारने लागू केलेला शेतकरी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप करत शुक्रवारी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत या कायद्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. या वेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्यसमन्वयक प्रा. किसन चव्हाण यांनी केले. शुक्रवारी सकाळी आंदोलनाला सुरवात करण्यात आली. आंदोलनात किसन चव्हाण यांच्यासह तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के,विनायक देशमुख,बबन राठोड,सखाराम कुर्हाडे,अरविंद सोनटक्के आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी बोलताना किसन चव्हाण म्हणाले की, मोदी शहा जोडीला शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नसून यांचे शासन हे उद्योगपतींना हवे असणारे धोरणे राबवत आहेत. आपल्याला शेतकऱ्यांचा खूप कळवळा आहे, असे जरी ते म्हणत असले तरीही त्यांचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.