अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग!
By Admin
अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग!
नगर सिटीझन live टिम-
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना अमरधाममध्ये प्रतीक्षा करावी लागत आहे. काल सायंकाळी नगर शहरात पाऊस आल्याने अंत्यसंस्कार विधी थांबविण्यात आले.
दिवसभरात 42 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. बेड मिळालाच, तर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी हातापाया पडावे लागत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, रुग्णालयांनीच रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यास या रुग्णालयांनी केराची टोपली दाखविली. शहरातील उपलब्ध बेडपेक्षाही जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्यसुविधा वेळेवर न मिळाल्याने मृतांची संख्या वाढत आहे.
जिल्हा रुग्णालयातून रोज 40पेक्षाही जास्त कोरोनाबाधितांचे मृतदेह नालेगावमधील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी पाठविले जात आहेत. तेथेही क्षमतेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे कर्मचारी व विद्युतदाहिन्यांवर ताण येत आहे. शहरात बुधवारी सायंकाळी सहा वाजता पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाचे पाणी अमरधाममध्ये शिरले. त्यामुळे सायंकाळी सहानंतर अंत्यसंस्कार करता आले नाहीत.
सकाळपासून 20 मृतदेहांवर विद्युतदाहिन्यांत, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 22 मृतदेहांना इतरत्र अग्निडाग देण्यात आला. पावसामुळे या कामात व्यत्यय आल्याने मृतांचे नातेवाईक अमरधामबाहेर अंत्यविधीच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यांना जड अंतःकरणाने "उद्या या' असे महापालिका कर्मचाऱ्यांना सांगावे लागले.
४२जणांवर अंत्यसंस्कार
नालेगाव अमरधाममध्ये आज दिवसभरात 42 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील सात दिवसांपासून 252 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.