महाराष्ट्र
36787
10
नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवा
By Admin
नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक- प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्षाची सुरूवात नुकतीच उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. हे प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरे करतांना युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देत असून या सक्षम युवांच्या माध्यमातून समर्थ भारत घडविण्याचा व देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत. यासोबतच बळीराजासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत 2023-24 या वर्षाच्या खरीप हंगामात केवळ एक रुपयात पिक विमा जाहिर केला. या योजनेत जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार 648 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल परिस्थितीत अधिसूचना काढून आतापर्यंत एक लाख 37 हजार 317 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 64.88 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच पीएम किसान योजने अतंर्गत जिल्ह्यातील तीन लाख 92 हजार 866 शेतकऱ्यांना 92.79 कोटींचा 15 वा हप्ता वाटप करण्यात आला असून 16 व्या हप्त्यासाठी चार लाख 6 हजार 720 लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे ही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
शासनाने ई- हक्क प्रणालीच्या माध्यमातून 11 प्रकारच्या नोंदी 7/12 वर घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य असून या प्रणालीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेखांचे संगणकीकरण कार्यक्रमा अंतर्गत 7/12, फेरफार व जन्म मृत्यू नोंदी इ. अभिलेख नागरिकांना ऑनलाईन पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असून नाशिक महसूल विभाग हा या कामात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, यासाठी सर्वांचे अभिनंदन करून यात असेच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.
नुकतेच नाशिक जिल्ह्याचा समावेश क्वालिटी सिटी अंतर्गत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मॉडेल स्कुल योजना तसेच JEE व NEET प्रवेशासाठी सुपर ५० हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या ७५ हजार नोकरी देण्याच्या संकल्पानुसार जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर पात्र ५०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून यात देखील नाशिक जिल्हा अग्रस्थानी असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, 'आनंदाचा शिधा' या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना डाळी, तेल अशा विविध सहा वस्तु अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच बेघर अथवा कच्ची घरे असणाऱ्या कुटुंबांना केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत जिल्ह्यात साधारण एक हजार 513 भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली असून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजने अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना अशा विविध आवास योजनांच्या माध्यमातून आत्तापर्यंत साधारण एक लाख 19 हजार 80 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी साधारण एक लाख 3 हजार 651 घरकुले पूर्ण झाली असून पीएम जनमन योजने अंतर्गत आदिम जमातीतील पात्र 803 कुटुंबांना प्रती घरकुल दोन लाख अनुदानासह मंजूरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 317 लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता नुकताच १५ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags :
36787
10





