'एमपीएससी'वरून, रोहित पवार, सत्यजित तांबेंचा सरकारला घरचा आहेर
By Admin
'एमपीएससी'वरून, रोहित पवार, सत्यजित तांबेंचा सरकारला घरचा आहेर
प्रतिनिधी - नगर सिटीझन
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ चुकीचा असल्याचं सांगतं आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीच आता घरचा आहेर दिला आहे. 14 मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात नवी पेठेत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी एकत्र येत गर्दी केली असून परीक्षा 14 मार्चलाच घेण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी ठिय्या मांडला आहे.
एमपीएससीच्या या निर्णयावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे यांनी म्हटलं की, एमपीएससी मंडळानं, असा निर्णय घेणं चुकीचं आहे. या निर्णयाचा निषेध करतो. महिनोन महिने अभ्यास केलेला असतो.
माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून म्हटलं की, यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची ची परीक्षाही झाली पाहिजे.
एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष द्यावं असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
माजी आमदार पंकजा मुंडे यांनीही महाविकास आघाडी सरकारने घेतेला हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत आहे असंही त्या म्हणाल्या.