ग्रामपंचायतींच्या 219 सदस्यपदासाठी मेमध्ये मतदान पोटनिवडणुकांचा बिगुल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुक्यातील पारेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी तसेच जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींच्या 219 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी 18 मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.
25 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.
पारेगाव ग्रामपंचायतीची थेट सरपंचासह सदस्यपदासाठी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. सरपंचपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता.
त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त आहे. तसेच 2019 ते 2022 या कालावधीत 128 ग्रामपंचायतींच्या 219 सदस्यपदांच्या जागा उमेदवारी अर्जाअभावी तसेच राजीनामा, निधन व अपात्र आदी विविध कारणाने रिक्त आहेत. या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केला.
18 एप्रिल रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार आहेत. 25 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 2 मे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, 3 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 8 मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा आहे. आवश्यकता वाटल्यास 18 मे रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, 19 मे रोजी निवडणुकीचा निकाल घोषित होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी सांगितले.
सदस्यपदांच्या तालुकानिहाय रिक्त जागा
अकोले 136, संगमनेर 19, श्रीरामपूर 6, राहुरी 8, नेवासा 10, नगर 4, पारनेर 8, पाथर्डी 1, शेवगाव 10, कर्जत 7, जामखेड 5, श्रीगोंदा 5.