भालेश्वर हायस्कूल विद्यालयात शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार लोकार्पण सोहळा
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात असलेले एफ.डी.एल शिक्षण संस्थेचे भालेश्वर हायस्कूल भालगाव, या विद्यालयामध्ये राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा शाहू, फुले,आंबेडकर पुरस्कार नुकताच लोकार्पण करण्यात आला.
या प्रसंगी गावातील श्री हनुमान मंदिर व संत तुकाराम महाराज मंदिर, ग्रामपंचायत चौक,या ठिकाणी लेझीम पथक व हलगी पथकाचे प्रात्यक्षिके झाले. यावेळी गावातील सुमारे ४०० पालक कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. लोकार्पण पुरस्काराची संपूर्ण गावांमधून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्रशस्त स्वरूपामध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक कमलाकर कासुळे, दिलीप खेडकर (दुकानदार), काकासाहेब कासुळे, शिक्षण विस्ताराधिकारी आजिनाथ खेडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा छात्रालय भालेश्वर हायस्कूल भालगावचे माजी विद्यार्थी रविंद्र ताठे (चितळी) हे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी प्रथमतः विद्येची देवता सरस्वती, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे, स्व. निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून व पुरस्काराचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र ताठे यांनी या प्रसंगी विद्यालयातील व छात्रालयातील आठवणींना उजाळा दिला व संपूर्ण प्रसंगच डोळ्यासमोर उभा केला. ते म्हणाले, कर्मयोगी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या वस्तीगृहात राहिलेले माझे जीवन यशस्वी झाले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिक्षण विस्ताराधिकारी आजीनाथ खेडकर यांनीही याप्रसंगी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमान गोर्डे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा सर्व इतिहासच विद्यार्थ्यांसमोर उभा केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत सोनवणे यांनी केले तर आभार विद्यालयाचे समन्वयक दिगंबर नजन यांनी मानले