महाराष्ट्र
अनुदान मिळणा-या विद्यार्थ्यांचे खाते आता 'या बँकेत काढावे लागणार ',
By Admin
अनुदान मिळणा-या विद्यार्थ्यांचे खाते आता 'या बँकेत काढावे लागणार ', महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे आदेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अनुदान देण्यात येणाऱया विद्यार्थ्यांचे खाते एचडीएफसी बँकेत उघडण्याचे आदेश राज्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. सातत्याने वेगवेगळ्या बँकेत खाते उघडण्याचे आदेश देण्यात येत असल्याने शिक्षक आता वैतागले आहेत.
एक वर्षापूर्वी महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. वर्ष संपायच्या आतच आता एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले आहे.
विशिष्ट कालावधीनंतर अनुदान दिवसेंदिवस कमी करण्यात आले. मात्र, वेगवेगळी प्रशासकीय व बँकिंग व्यवहाराची कारणे सांगत शाळास्तरावरील बँकांची खाती वेगवेगळ्या बँकेत काढण्याचे आदेश राज्यस्तरावरून देण्यात येत आहेत. राज्यात एकीकडे प्राथमिक शाळेत शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. केंद्रप्रमुखांची 4860 पैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. अनेक योजनांचा भडीमार शिक्षकांच्या दैनंदिन शैक्षणिक कार्यात केला जात आहे.
महाराष्ट्र बँकेच्या शाखा राज्यातील अनेक जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांत नसल्यामुळे व्यवहाराला सुविधा होईल, अशा बँकेत खाते काढण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या घटनेने शासनाकडे आग्रह धरला होता. मात्र, वास्तव स्थितीकडे दुर्लक्ष करून शासकीय यंत्रणेच्या हट्टामुळे महाराष्ट्र बँकेत मागील पाच-सहा महिन्यांपूर्वीच खाते उघडण्यात आले. आता 20 जुलै 2022 रोजी काढलेल्या पत्रानुसार सर्व शिक्षा अभियान अनुदान खाते एचडीएफसी बँकेत उडण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरी भागापुरती मर्यादीत असलेली एचडीएफसी बँक आणि ग्रामीण भागात असणाऱया शाळा यांच्यात समन्वय कसा साधला जाणार असा प्रश्न शिक्षण संघटनेच्या वतीने विचारात घेत आहे.
नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये एचडीएफसी बँकेच्या शाखा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे शेजारच्या तालुक्यात जाऊन खाते उघडायचे म्हटले तर अनेकांना डोकेदुखी ठरणार आहे.
नगर जिल्ह्यात पाच हजार शाळा आणि पंधरा शाखा
नगर जिल्ह्यात एचडीएफसी बँकेच्या शाखा असलेली ठिकाणे नगर, नागापूर पाईपलाईन रोड, सावेडी, कोपरगाव, लोणी खुर्द, पारनेर, राहुरी, साकोरी, संगमनेर, शेवगाव, जामखेड, शिर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा, सोनई व टाकळीमिया इथेच एचडीएफसी बँकेच्या शाखा आहेत. अनेक तालुक्यांमध्ये व महत्त्वाच्या शहरांमध्ये बँकेच्या शाखा नाहीत. अकोलेसारख्या तालुक्याचा विस्तार लक्षात घेता त्या तालुक्यातील अनेक शिक्षकांना संगमनेर येथे येणे आर्थिकदृष्टय़ा भुर्दंड देणारे ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचा शोध घेऊन संबंधित जिल्ह्यात संबंधित बँकांमध्ये खाते उघडण्याची गरज आहे. मात्र, ते लक्षात न घेता सरसकट आदेश दिले जात असल्याने शाळांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
शिक्षक संघटना आक्रमक
कोरोनाच्या कालखंडानंतर अनेक दिवसांनी शाळा सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मुलांना मूळ पदावर आणण्यासाठीच शिक्षकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांना कसरत करत विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवावे लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून सातत्याने शिक्षकांना माहितीत गुंतवले जात आहे. 15 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश वितरण, शालेय पोषण आहाराची पाच वर्षांचे अभिलेखे, शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, ऑनलाइन कामे यामध्ये शिक्षक गुंतून पडल्याने शिक्षक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. यापूर्वी वेगवेगळ्या पोर्टलवरती माहिती भरल्यानंतर शिक्षकांना पुन्हा ऑनलाइन कामे व माहिती द्यावी लागणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित माहितीचा कोणताही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले असून, शिक्षकांनाच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची माहिती द्यावी लागत आहे. त्यामुळे आमची आता या कामातून सुटका करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Tags :
48222
10