महाराष्ट्र
संशयातून पत्नीचा खून: पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
By Admin
संशयातून पत्नीचा खून: पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून केल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी सकाळी उघडकीस आली होती. बिल्कीस उर्फ मीना मच्छिंद्र पिट्टेकर (५०, रा.राहुल नगर, रेल्वे स्टेशन परिसर) असं मृत महिलेचं नाव आहे, तर मच्छिंद्र पिराजी पिट्टेकर (६०, रा.
चिलेखनवाडी, ता.नेवासा, राहुलनगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेनंतर मच्छिंद्र हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन पथकांनी नगर जिल्हा पिंजून काढला. मात्र अद्यापही मारेकरी पती पोलिसांच्या हाती लागलेला नसून आम्ही लवकरच त्याला ताब्यात घेऊ, असं सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितलं आहे.
मच्छिंद्र पिट्टेकर हा मोलमजुरीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून औरंगाबाद शहरात आला होता. रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर भागात तो पत्नीसह भाड्याच्या घरात राहात होता. पत्नी बिल्कीससोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. या लग्नापूर्वी बिल्कीस यांना शमा रफिक शेख नावाची एक मुलगी होती, तर प्रेमविवाहनंतर एक मुलगी शिवकन्या संजय सिंह आणि मुलगा जालिंदर हे दोन आपत्य होते. लग्न झाल्यानंतर हे दोघेही अहमदनगरला राहत होतो, तर शमा शेख ही औरंगाबादमध्ये राहते.
मयत बिल्कीस आणि मुलगी शमा या दोघी मजुरीला जात होत्या. गेल्या काही दिवसांपासून मच्छिंद्र हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हे भांडण मिटवले. परंतु रात्री बिल्कीस झोपलेल्या असताना मच्छिंद्र याने घरातील दगडी खलबत्ता बिल्कीस हिच्या डोक्यावर व तोंडावर मारला. यात बिल्कीस यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मच्छिंद्रने घराच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप लावलं आणि पसार झाला.
नगर जिल्ह्यात शोधाशोध
आरोपी मच्छिंद्र याच्या शोधासाठी सातारा पोलिसांची दोन पथके तर गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले आहे. नगर जिल्ह्यातील त्याचे नातेवाईक असलेल्या शेवगाव, पैठण, नेवासा तसेच नगर शहरातील विविध भागात दोन पथकांनी रविवार आणि सोमवारी परिसर पिंजून काढला. मात्र त्याचा काहीच सुगावा लागला नाही. तिसरे पथक शहर व परिसरात देखील मच्छिंद्र याचा शोध घेत आहे.
Tags :
10051
10