तहसीलदारांनी ठोठावला साडेसोळा लाखांचा दंड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विना परवाना मुरूम व खडीची वाहतूक करणार्या सात वाहनांना पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर यांनी सोळा लाखांहून अधिक रुपयांचा दंड केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून शेवगाव-तिसगाव रस्त्यावर तालुक्यातील साकेगाव शिवारात एका जेसीबीच्या साह्याने मुरूम उत्खनन करून चार ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची वाहतूक करणारी पाच वाहने छापा टाकून ताब्यात घेतली होती. तसेच, खडी वाहतूक करणारा डंपर व टेम्पो अशी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली होते. पुढील कारवाईसाठी ही वाहने पाथर्डी तहसील कार्यालयाकडे देण्यात आली होती. त्यानुसार तहसीलदार वाडकर यांनी या वाहनांना सुमारे सोळा लाख पस्तीस हजारांचा दंड केला आहे.
किशोर श्रीधर पवार (रा.साकेगाव), संदीप बाबासाहेब ताटे, गणेश चंद्रभान घोडके, अशोक पांडुरंग आमटे (सर्व रा.चितळी) यांच्याकडील ट्रॅक्टरला प्रत्येकी एक लाख एक हजार सहाशे, शिवाजी दादाबा गर्जे (रा. पाडळी) यांच्याकडील जेसीबीला साडेसात लाख, तर मधुकर विश्वनाथ रोकडे (रा शेवगाव) यांच्या अवैध खडी वाहतूक करणार्या डंपरला दोन लाख 89 हजार चारशे रुपये, सिकंदर सय्यद (रा.राक्षी ता. शेवगाव) यांच्या टेम्पोला एक लाख 59 हजार 550 रुपये इतका दंड महसूल विभागाने केला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे विना
परवाना मुरूम व खडीची वाहतूक केल्याप्रकरणी एक जीसीबी, चार ट्रॅक्टर, एक डंपर व एक टेम्पो अशा एकूण सात वाहनांच्या मालकांकडून 16 लाख 35 हजार 350 रुपये एकूण एवढी दंडाची रक्कम महसूल प्रशासन वसूल करणार आहे.