पाथर्डी येथे थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबूजी आव्हाड यांची जयंती साजरी
By Admin
पाथर्डी येथे थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबूजी आव्हाड यांची जयंती साजरी
पाथर्डी प्रतिनिधी:
बाबुजींनी निस्वार्थीपणे आपल्या कार्याची पताका हाती घेऊन पाथर्डी तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा केली.जीवन जगत असतांना गरजू, उपेक्षित जनतेचा ज्यांनी आशीर्वाद घेतला. त्या व्यक्तींची आज जगात महती आहे. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे स्व. बाबुजी होत.बाबुजींनी आपल्या जीवनकार्यात पुणे, मुंबई या ठिकाणी राहूनही समाजकार्य केले असते, परंतु त्यांनी आपल्या पाथर्डीसारख्या दुर्गम, दुष्काळग्रस्त भागाची निवड केली.येथील उसतोडणी मजुरांसाठी व त्यांच्या मुलांच्या हाती कोयता न येता शिक्षणाच्या माध्यमातून मागासलेपणा दूर करण्यासाठी अविरतपणे झटणे बाबुजींनी पसंत केले. जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। या उक्तीप्रमाणे समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या बाबूजींची महती चंद्र, सूर्य असेपर्यंत जिवंत राहील, असे प्रतिपादन येळेश्वर संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, श्री. विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे, डॉ. अभिमन्यू ढोरमारे आदी उपस्थित होते.
रामगिरी महाराज पुढे म्हणाले, जगात महान व्यक्तीमत्वांचीच जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. बाबूजींना त्यांच्या कार्यकाळात अनेक संत महात्म्यांचा सहवास लाभला. त्यांच्या कृपाशीर्वादाने बाबुजींनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाथर्डी सारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम केले व ते अविस्मरणीय होते. बाबूजींसारखी निस्वार्थी व्यक्ती पाथर्डी तालुक्यात पुन्हा होणे नाही, असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी रामगिरी महाराजांच्या हस्ते महाविद्यालयीन कर्मचारी बाबासाहेब पालवे यांचा सेवापुर्ती निमित्त सपत्नीक सन्मान करण्यात आला. स्व. बाबुजींच्या जयंतीनिमित्त शहरातील होतकरू विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार मुख्याध्यापक शरद मेढे यांनी मानले.