दुर्गंधीयुक्त, गढुळ पाणीपुरवठ्याने शेवगावकर हैराण!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव शहरातील खंडोबा माळ नजीकच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पिण्याच्या पाण्यात क्लोरीन, तुरटी, टीसीएल आदी जंतुनाशक औषधे न मिसळता संबंधितांकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
शेवगाव हे तालुक्याचे गाव असून, येथील लोकसंख्या 50 हजारांच्या आसपास आहे. शहराला 8 ते 10 दिवसांतून एकदा व तोही अल्पप्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने उन्हाच्या तीव्र काहिलीत महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची टंचाई आणि अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शहराच्या अनेक भागांत पिण्याचे पाणी सुटले तर पहिले 8 ते 10 मिनिटे दुर्गंधीयुक्त पाणी येते. शेवगाव नगरपरिषदेची पाणीपट्टी याआधी 1500 रुपये होती, आता ती वाढवून 1 हजार 800 रुपये करण्यात आली आहे. एकतर महिन्यातून केवळ तीन ते चार वेळा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना व जनतेला दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा करून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार सहन करण्यापलीकडचा असल्याची टीका जनतेतून होत आहे.
शेवगाव नगरपरिषद प्रशासनाने जनतेच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करणारे निवेदन येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नीरज लांडे, अभिजित आव्हाड, अमोल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबधितांना दिले आहे. याबाबत सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर जनआंदोलन करून आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.