महाराष्ट्र
गळीत हंगाम 15 ऑक्टोबरनंतरच ! जिल्ह्यात 24 कारखान्यांची धामधूम
By Admin
गळीत हंगाम 15 ऑक्टोबरनंतरच ! जिल्ह्यात 24 कारखान्यांची धामधूम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
यंदाच्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यात 1 लाख 73 हजार 58 हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असून, 15 ऑक्टोबरनंतरच गळीत हंगाम सुरु करण्याचे निर्देश साखर कारखान्यांना दिले आहेत.
त्यानुसार 24 साखर कारखान्यांची गळीत हंगामासाठी धामधूम सुरु आहे. आतापर्यंत 18 कारखान्यांनी गाळपास परवाना मिळावा, यासाठी अर्ज दाखल केले आहेत. परवाना मागणीचा आज शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे मिळून एकूण 23 साखर कारखाने आहेत. यंदाच्या वर्षी पारनेर तालुक्यात सोपानराव धसाळ खासगी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे आजमितीस 24 साखर कारखाने गाळपासाठी असणार आहेत. डॉ. तनपुरे व हिरडगावचा साईकृपा-2 या दोन कारखान्यांचा यंदाच्या गाळपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
गळीत हंगाम सुरु करण्यास साखर आयुक्त मान्यता देणार आहेत. आतापर्यंत केदारेश्वर, शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, कुकडी, मुळा, अंबालिका, प्रसाद, विखे, अशोक, जय श्रीराम, नागवडे, थोरात, वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर, अगस्ती, पियुष, गणेश व सोपानराव ढसाळ या अठरा कारखान्यांनी गाळप परवाना मागणीचे अर्ज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे अर्ज केले. 30 सप्टेंबर परवाना मागणीचा शेवटचा दिवस आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात एकूण 1 लाख 73 हजार 58 हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होता. यामध्ये 85 हजार 490 हेक्टर क्षेत्रात खोडवा आहे. या एकूण क्षेत्रातून 1 कोटी 36 लाख 35 हजार 887 मे.टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. यंदाच्या गळीत हंगाम पूर्व तयारीनिमित्त बुधवारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. शासनाने 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापूर्वी गळीत हंगाम सुरु करु नका, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
प्रत्येक शेतकर्यांच्या उसाची नोंद कारखान्यांना बंधनकारक आहे. त्यासाठी कारखान्यांना पावत्या द्याव्या लागणार आहेत. पावत्यानुसार गाळपाचे नियोजन करा. जिल्हाभरात एकूण 150 हार्वेस्टर आहेत. सुरुवातीपासूनच हार्वेस्टरचा वापर करा. त्यामुळे वेळेत तोडणी करणे शक्य होणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी बैठकीत नमूद केले. ऊस वाहतुकीसाठी बाहेरील जिल्ह्यांतून जनावरे येणार आहेत. लसीकरण झालेल्या जनावरांनाच एन्ट्री द्या. जिल्ह्यात आल्यानंतर पुन्हा त्यांचे लसीकरण करावे,असे निर्देश प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी दिले आहेत.
गतवर्षी 1.85 कोटी पोती साखरेचे उत्पादन
गेल्या वर्षी 14 सहकारी व 9 खासगी असे एकूण 23 साखर कारखाने सुरु होते. या कारखान्यांनी एकूण 1 कोटी 85 लाख 53 हजार मे. टन उसाचे गाळप केले होते. या गाळपातून 1 कोटी 85 लाख 47 हजार 485 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले होते. साखर उतारा सरासरी 10 टक्के इतका होता. अंबिका शुगर्सने सर्वाधिक 19 लाख 51 हजार 160 मे.टन उसाचे गाळप करुन 21 लाख 650 क्विंटल साखर उत्पादित केली.
साखर कारखान्यांकडील साधनसामुग्री
ट्रक : 2069, ट्रॅक्टर: 3287, बैलगाड्या : 8859 , कोयते : 1,17, 899 महिला : 54,599
Tags :
440
10