महाराष्ट्र
965
10
भाजपमध्ये गेल्याने त्यांना शांत झोप लागतेय;यांनी केला घणाघाती आरोप
By Admin
भाजपमध्ये गेल्याने त्यांना शांत झोप लागतेय;यांनी केला घणाघाती आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
‘माझ्याकडे केवळ शीट आहे, बॅलन्स नाही. त्यांच्याकडे बॅलन्स आहे. पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद भोगून सुद्धा ते भाजपामध्ये गेले. त्यामुळे त्यांना शांत झोप लागत आहे,’ असा घणाघाती आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विखे यांच्यावर केला आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यामध्ये केवळ एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याभागात ही हसन मुश्रीफ यांनी भेट दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार डॉ.सुजय विखे यांनी मुश्रीफ यांच्यावर मागील आठवड्यात जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘मुश्रीफ यांना त्यांचे बॅलन्स शीट पाहू द्या. अकाउंट बुक चेक करू द्या. नेमके किती पैसे आले, किती गेले हे एकदा कळू द्या. त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील.’
आज पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगरमध्ये आले असता त्यांनी विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘आमच्याकडे शीट आहे, बॅलन्स नाही. त्यांच्याकडे बॅलन्स आहे. पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद भोगून ते भाजपात गेले आहेत. त्यामुळे त्यांना शांत झोप लागत आहे. नुकतेच हर्षवर्धन पाटील म्हणाले होती की त्यांना आता शांत झोप लागते. तशीच शांत झोप विखे यांना लागत असावी.’
मला वाटलं होतं कर्डिले येणार नाहीत
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यात दिसत नाही, असे वक्तव्य माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले होते. या वक्तव्याचाही समाचार आज मुश्रीफ यांनी घेतला. ते म्हणाले, ‘शिवाजी कर्डिले हे मला नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात भेटले होते. मला वाटले होते की कर्डिले हे देवेंद्र फडणवीस गटाचे आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या कार्यक्रमांना येणार नाहीत. पण ते तेथे आले होते,’ असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. ‘मी कालच अकोले तालुक्यात दौऱ्यावर होतो. मी दौऱ्यावर असताना ते वाट वाकडी करून आले असते, तर माझी व त्यांची भेट झाली असती,’ असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
Tags :

