महाराष्ट्र
2104
10
संस्था राज्यात आघाडीवर असून तिची कामगिरी अभिमानास्पद सतीश गुगळे
By Admin
संस्था राज्यात आघाडीवर असून तिची कामगिरी अभिमानास्पद सतीश गुगळे
माध्यमिक शिक्षक सोसायटी सेवानिवृत्त कर्मचारी कृतज्ञता सोहळा
पाथर्डी- प्रतिनिधी
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी सभासदांच्या हितासाठी विविध योजना आखून त्यांची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असल्याने त्याव्दारे सभासदांना मोठा आर्थिक लाभ मिळत आहे. संस्थेचा व्यवस्थापकीय खर्च हा अडीच टक्क्याची मर्यादा असतांनाही फक्त ५५ पैसे आहे. अठरा लाख रु. कर्जावर अवघे साडे सात टक्के व्याज आकारणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. हा व्याजदर सात टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. या व्यतिरीक्त डिव्हीडंट वर देखील विपरीत परीणाम होणार नाही, अशाप्रकारची काळजी घेवून सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेशराव मिसाळ यांनी व्यक्त केले.
पाथडी येथे सोसायटीच्या कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी कृतज्ञता सोहळा व गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार सोहळा या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे अध्यक्षस्थानी होते तर जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, पद्मभुषण वसंतदादा पा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव महेंद्र शिरसाट, संचालक वसंतराव खेडकर, दिलावर फकीर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या भाषणात चेअरमन सुरेशराव मिसाळ यांनी संस्थेचे मार्गदर्शक प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या अधिपत्याखाली संस्थेची प्रगती आणि सभासद हिताच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संस्थेने साडेसात टक्के व्याजदराने ८३३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून ९७ कोटींचे भागभांडवल आहे. १ कोटी रुपयांचा कृतज्ञता निधी जमा असून संस्थेची ७५ कोटींची गुंतवणूक आहे. सर्व योजनांचा सभासदांना आवर्जुन लाभ दिला जात असल्याचे सांगितले.
तसेच अध्यक्षपदावरुन बोलतांना सतिश गुगळे म्हणाले की, ही संस्था राज्यात आघाडीवर असून तिची कामगिरी अभिमानास्पद आहे. सदर संस्था केवळ आर्थिक हित न पाहता सेवानिवृत्त सभासदांप्रती कृतज्ञता व्यक्त करते, याचाच अर्थ सदर संस्था सर्व सभासदांना आपल्या कुटुंबातील सदस्यच मानते, हे अत्यंत उल्लेखनीय आहे. जसा संस्थेच्या प्रगतीत सभासदांचा मोलाचा वाटा आहे तसा सभासदांच्या प्रगतीतही संस्थेचा मोलाचा वाटा आहे. सभासदांसाठी हक्काचा आधार म्हणून संस्थेने विश्वास संपादन केला आहे. त्याव्दारे संस्था आणि सभासद या दोन्ही घटकांचा शाश्वत उत्कर्ष होत आहे.
यावेळी उपस्थित विद्यार्थी वर्गाला देखील त्यांनी यशाचा कानमंत्र देतांना कितीही विपरीत परीस्थिती असली तरी तिला संकट न मानता संधी म्हणून बघीतले पाहिजे व आपले ध्येय निश्चित असेल तर यश मिळतेच, मात्र त्यासाठी एकाग्रता, प्रचंड परीश्रम करण्याची तयारी हवी, असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख अतिथी अविनाश मंत्री यांनी देखील आपले विचार व्यक्त करतांना भविष्यातील आर्थिक बदल व त्यास अनुसरून सभासदांनी योग्य गुंतवणूक कशी करावी, या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व्हि. एन. मरकड यांनी विचार व्यक्त करतांना संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी चि. अवधुत मिसाळ याने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक आत्माराम कचरे, कार्यालयीन कर्मचारी गणेश करवंदे, विजय नजन, वैभव नितनाथ यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी करून आभार वसंतराव खेडकर यांनी मानले.
Tags :

