अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी मदत देणार - पालक मंञी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिमुळे ज्या गावात शेतीचे व घराचे नुकसान झाले आहेत, अशा गावातील बाधिताना दिवाळीपर्यंत मदत देण्यासाठी प्रयत्न करणार, असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित झालेल्या भागाचे बाकी असलेले पंचनामे तात्काळ पूर्ण करून घ्यावेत. राज्य शासनातर्फे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दिवाळीपर्यंत थेट त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल. तसेच शासन निर्णयानुसार अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्याच्यावर नुकसान झालेल्या पिकांखाली क्षेत्रासाठी द्यावायचा दर निश्चित झाला आहे. जिराईत क्षेत्र १० हजार रुपये हेक्टर, बागाईत क्षेत्रासाठी १५ हजार रुपये हेक्टर, फळबाग क्षेत्र २५ हजार रुपये हेक्टर याप्रमाणे मदत जाहीर झाली आहे. अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाई म्हणून ३७ हजार ५०० प्रति हेक्टर याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. ३७४ हेक्टर जमीन अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेली आहे. या क्षेत्रासाठी हा लाभ देण्यात येणार आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडला काही भागात कमी दिवसात जास्त पाऊस झाला त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी उपस्थित होते.